नवी दिल्ली :काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी स्वीकारला आणि लागलीच काँग्रेसची कार्यकारी समिती बरखास्त करून सुकाणू समिती स्थापन केली. 

विरोध पक्ष विशेषत भाजपकडून घराणेशाहीचा आरोप होत होता. तसेच पक्षाचा दिवसेंदिवस जनाधार कमी होत आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष ठरवला आहे. खरगे हे २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील काँग्रेस अध्यक्ष ठरले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच खरगे यांनी आपल्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच सुकाणू समिती स्थापन केली. ही समिती काँग्रेस कार्यकारी समितीच्या ऐवजी काम करणार आहे. या समितीचे अध्यक्ष खरगे असतील आणि सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, ए.के. अ‍ॅन्टोनी, पी. चिंदबरम, दिग्विजय सिंह, अभिषेक मनु सिंघवी, अजय माकन, अंबिका सोनी, आनंद शर्मा, अविनाश पांडे, हरीष रावत, जयराम नरेश, जितेंद्र सिंह, शैलजा, के.सी. वेणुगोपाल, लालथनवाला, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, रघुवीर मिना, ओमन चंदू, तारीक अनवर, चेल्ला कुमार, अजय कुमार, अधीर रंजन चौधरी, भक्तचंदन दास, देवेंद्र यादव असे २९ सदस्य आहेत.

हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या

येत्या दोन वर्षांत मल्लिकार्जून खरगे यांच्यासमोर १९ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे. त्यात राजस्थानचाही समावेश आहे. तेथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे. हे सरकार वाचवण्याचे आव्हानही खरगे यांच्या खांद्यावर असणार आहे.

पक्षाला फायदा होईल – सोनिया गांधी

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खरगे यांना शुभेच्छा दिल्या.  मी खरगे यांचे मनापासून अभिनंदन करते. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांपासून ते अध्यक्षपदाचा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर पूर्ण केला आहे. मी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते.