राज्यसभेत पेपरफुटीविरोधी विधेयक मांडले जात असतानाच, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर आणि लाठीमारावर गृहमंत्र्यांनी अद्याप मौन का बाळगले आहे, असा सवाल करत खरगे यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
गृहमंत्र्यांचे मौन का? खरगेंचा संतप्त सवाल
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत खरगे म्हणाले, “गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. जर ते विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमाराचे आणि अश्रूधुराच्या वापराचे समर्थन करू शकत नसतील, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना खरगे पुढे म्हणाले, “अमित शाह यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसते. जेव्हा जेव्हा संकटाची वेळ येते, तेव्हा ते सर्व आजारांवर एकच उपाय असलेल्या ‘जिंदा तिलिस्मात’ या औषधाप्रमाणे जे. पी. नड्डा किंवा इतर नेत्यांना पुढे करतात.”
गृहमंत्रीजी, तुमचं तोंड कोणी शिवलंय का?
राज्यसभेत अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्र्यांच्या मौनावर बोट ठेवत थेट प्रश्न विचारला, “गृहमंत्र्यांचे या मुद्द्यावर मौन का आहे? गृहमंत्रीजी, तुमचं तोंड कोणी शिवलंय का?” असा सवाल त्यांनी केला. खरगे यांच्या या विधानावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला, ज्यामुळे राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.
अमानुष पोलीस कारवाईला जबाबदार कोण?
जंतरमंतर येथे विरोधकांच्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत खरगे यांनी सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “देशभरातून आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष पद्धतीने कारवाई केली जात आहे. पोलीस कारवाईत एका विद्यार्थ्याचा डोळा गेला, तर कोणाचा कान आणि हात निकामी झाला. या गंभीर आणि अमानुष कारवाईला थेट गृहमंत्री अमित शाहच जबाबदार आहेत,” असा गंभीर आरोप खरगे यांनी केला.
देशाची जनशक्ती तुम्हाला बाहेर पडण्यास भाग पाडेल
भाजप नेत्यांनी खरगे यांच्या भाषेवर आक्षेप घेत ती असंसदीय असल्याचे म्हटले. यावर स्पष्टीकरण देताना खरगे म्हणाले, “मी कोणतीही असंसदीय भाषा वापरलेली नाही. बंद खोलीत बसलेल्या गृहमंत्र्यांना मला सांगायचे आहे की, ते जास्त काळ लपून राहू शकत नाहीत. मी त्यांना वैयक्तिकरीत्या बाहेर ओढून काढेन असे म्हटलेले नाही, तर या देशातील ‘जनशक्ती’ –नागरिक, विद्यार्थी आणि महिला गृहमंत्र्यांना सभागृहात येऊन उत्तर देण्यास भाग पाडेल.”
