नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या कथित ‘शुद्धीकरण’ विधीचा मुद्दा गुरुवारी राज्यसभेत उपस्थित केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. हा प्रकार केवळ एका राजकीय सभेपुरता मर्यादित नसून जातीय भेदभावाची मानसिकता दर्शवणारा असल्याचा आरोप खरगे यांनी केला. त्यावर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी भाजप अशा कुठल्याही प्रकाराचे समर्थन करत नाही. या घटनेशी भाजपचा कोणताही संबंध नाही मात्र, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर ८ ऑगस्टला काँग्रेसच्या जाहीर सभेत खरगे भाषण झाले होते. या सभेनंतर ११ ऑगस्टला याच ठिकाणी हवन आणि कथित ‘शुद्धीकरण’ विधी केला गेल्याचे खरगेंनी राज्यसभेत सांगितले. या घटनेवरून काँग्रेसने भाजपवर नेम साधला असून, खरगे यांना दलित असल्यामुळे लक्ष्य केल्याचा आरोप केला.
राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करताना खरगे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. माझ्या उपस्थितीमुळे मैदान अशुद्ध झाले होते का, असा सवाल खरगेंनी केला. आपल्याला अस्पृश्य मानले जात असल्याची भावना या घटनेतून निर्माण झाल्याचे सांगत खरगेंनी, देशात आजही अशा प्रकारची मानसिकता अस्तित्वात असल्याचे खरगे म्हणाले. “तुम्ही मला अस्पृश्य मानता का?” असा सवालही त्यांनी केला.
सभापतींचा हस्तक्षेप
या मुद्द्यावर राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी हस्तक्षेप केला. सर्व पक्षांच्या सदस्यांनी अस्पृश्यतेचा निषेध केला आहे. पक्ष वा विचारसरणीचा विचार न करता आम्ही सर्वजण याचा निषेध करतो. कोणालाही ‘शुद्धीकरणा’च्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची गरज नाही, असेही राधाकृष्णन यांनी नमूद केले. सभापतींनी केंद्र सरकारला खरगेंच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले. ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले, त्यांची चौकशी करून त्यांना अटक केली जावी आणि शिक्षा दिली जावी, अशी सरकारला विनंती करतो, असे ते म्हणाले.
हा मुद्दा केवळ माझ्या अपमानाचा नसून संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचा आहे. जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणालाही कमी लेखण्याची प्रवृत्ती लोकशाही व्यवस्थेला मान्य होऊ शकत नाही. – मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
भाजपला या ‘शुद्धीकरण’ विधीपासून स्पष्टपणे दूर केले. भाजप अशा प्रकारच्या कृतीचे समर्थन करत नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. – जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री
