Mallikarjun Kharge Vande Mataram Controversy: वंदे मातरम गाण्यावरुन सध्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंवर टीका केली जात आहे. पक्ष मुख्यालय आणि गोव्यातील पक्षाच्या कार्यक्रमातील घटनांवरुन खरगेंवर टीका केली जातेय. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे कारण काय? असा सवाल खरगेंनी मंगळवारी उपस्थित केला. जुन्या स्वरुपात वंदे मातरम गाणे गुन्हा असेल महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, असे खरगे म्हणाले. गोव्यात माध्यमांशी बोलताना खरगेंनी हे वक्तव्य केलं.

भाजपाचा आरोप

स्वातंत्र्यदिनी संपूर्ण वंदे मातरम गाण्यापासून सोनिया गांधींनी रोखाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी खरगेंनी तिरंगा फडकवल्यानंतर वंदे मातरम गाण्यात आले. मात्र, इथं उपस्थित असणाऱ्या गायकांना संपूर्ण वंदे मातरम गाण्यास सोनिया गांधींनी रोखले असा आरोप भाजपाने केला आहे. यावेळी सोनिया गांधी खरगे यांच्याशी काहीतरी बोलताना देखील दिसत आहेत. वंदे मातरम थांबविण्यासाठीच दोघांमध्ये संवाद झाल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

काँग्रेसने फेटाळले आरोप

दरम्यान, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. खरगेंसाठी खुर्चीची व्यवस्था करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. खरगे बराचवेळ उभे होते, असे काँग्रेसने म्हटले आहे. “हे पूर्णपणे खोटं आहे. सोनिया गांधींनी असं काही केलं नाही. काँग्रेस अध्यक्षांची तब्येत ठीक नाही. त्यांना जास्तकाळ उभं राहता येत नाही. यावेळी काही व्यवस्था करता येईल का यासाठी सोनिया गांधींनी इशारे केले. वंदे मातरम थांबविण्यासाठी नाही”, असे काँग्रेस नेते उदीत राज म्हणाले. दरम्यान, वंदे मातरम गाण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सोमवारी दिल्ली पोलिसांत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंद करण्याची मागणी केली जात आहे.

खरगे काय म्हणाले?

याबाबत माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, “ते काय तक्रार दाखल करणार? महात्मा गांधींनी जे वंदे मातरम गायले तेच आम्ही गायले. जवाहरलाल नेहरुंनी गायले ते आम्ही गायले. १८ वर्षे आम्ही तेच गायले जे त्यांनी गायले, वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गायले. आणि १२ वर्षे मुख्यमंत्री म्हणून (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी देखील ते वंदे मातरम गायले. हा गुन्हा आहे तर १८ वर्षांपासून ते हा गुन्हा करत आहेत. हा गुन्हा आहे तर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरुंवर पण गुन्हा दाखल करा”, असे खरगे म्हणाले.