नवी दिल्ली : उद्योजकांनी पश्चिम बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केले. कधी काळी राज्यात एका वर्षांत ७५ लाख मनुष्य दिवसांचे नुकसान होत असे, मात्र आज हे प्रमाणे शून्यावर आले आहे असे त्यांनी उद्योजकांच्या एका मेळाव्यात सांगितले. केंद्र सरकारशी बोलून, केंद्रीय यंत्रणा उद्योजकांना ‘त्रास देणार नाहीत’ याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी राज्यपालांना केले.

 ‘बंगाल ग्लोबल बिझिनेस समिट २०२२’च्या उद्घाटनाच्या सत्रात बॅनर्जी यांचे भाषण झाले. राज्यपाल जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली, मात्र ‘बांधीलकी’ वर भर दिला.

 यानंतर, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी येत्या काही वर्षांत राज्यात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. या सत्रापूर्वी त्यांनी बॅनर्जी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.