Mamata Banerjee Attack : गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याही ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने (ममता बॅनर्जी गट) केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.

तृणमूल काँग्रेसने (ममता बॅनर्जी गट) आरोप केला की, ममता बॅनर्जी या दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी कोलकातामधील कालीघाट येथील आपल्या निवासस्थानाबाहेर पडत असताना एका महिलेने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्लखोर महिलेने ममता बॅनर्जी यांची साडी खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्याकडे एक चाकू आढळून आल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली आहे. झालं असं की, ही हल्लखोर महिला ममता बॅनर्जी यांना हाक मारत त्यांच्या दिशेने धावत गेली. यावेळी तिने ममता बॅनर्जी यांच्या अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर शिवीगाळ केली, असा आरोप तृणमूलने केला.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या टीएमसीच्या आरोपानंतर आता पोलीस या संपूर्ण घटनेची आणि आरोपांची चौकशी करणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, या कथित घटनेनंतर आता माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर याआधी झाला होता हल्ला

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली होती. ममता बॅनर्जी या उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या घरी भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी दाखल झाल्या होत्या. यावेळी काही जणांनी ममता बॅनर्जी यांच्या ताफ्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या वाहनांवर दगड आणि चिखल व चपला फेकण्यात आल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेवेळी नागरिकांनी ‘चोर,चोर’ अशी घोषणाबाजी केली होती.