पीटीआय, पुरुलिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भूतकाळातील कृत्यांसाठी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल व्हायला हवे, असा पलटवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पुरुलिया जिल्ह्यातील मनबाजार येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. २०२१ च्या विधानसभा निवडणुकवेळी बॅनर्जी यांना झालेल्या जखमेवरून शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत डॉक्टरांचा अहवाल तपासा आपण मृत्यूच्या दारातून परत आलो आहेात, असे त्या म्हणाल्या.

अमेरिकेतून भारतीयांना परत पाठवण्याच्या घटनेचा उल्लेख करत बॅनर्जी यांनी शहांवर टीका केली. गुजरातमधील लोकांना अमेरिकेतून दोर बांधून परत पाठवले जात होते, तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल त्यांनी केला. उमेदवार कोण हे पाहण्याची गरज नाही, मीच उमेदवार, माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. त्यांनी भाजपवर लोकांच्या आहारावर निर्बंध आणण्याचा आरोपही केला. भाजप सत्तेत आल्यास लोकाना मासे, मांस, अंडी खाता येणार नाही. ‘लक्ष्मी भंडार’ योजना बंद केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.