भाजप या एका पक्षामुळे आपला संपूर्ण देश संकटात सापडला आहे. या संकटातून देशाला बाहेर काढायचे असेल तर सत्तेवरून भाजपला पळवून लावले पाहिजे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पाटणा शहरात झालेल्या ‘भाजप भगाओ देश बचाओ’ रॅलीत त्या बोलत होत्या.

आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी अनेक म्हणींचा आणि शेरो-शायरीचाही वापर केला. महाआघाडी तोडण्यासाठी नितीशकुमार सर्वस्वी जबाबदार आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या नावावर नितीशकुमार यांनी सत्ता काबीज केली आणि मग ते भाजपला जाऊन मिळाले, हा प्रकार म्हणजे ‘माल महाराजा का और मिर्जा खेले होली’ असा आहे अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बिहारच्या जनतेला नितीशकुमारांचा खरा चेहरा समजला आहे त्यामुळे भविष्यात जनता नितीशकुमारांची साथ सोडून लालूप्रसाद यादवांना साथ देईल असेही त्यांनी म्हटले आहे.

नसबंदीमुळे जर इंदिरा गांधी यांचे सरकार कोसळले होते तर नोटबंदीच्या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारही कोसळेल अशीही टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. देशात गरीब, अल्पसंख्य आणि शिखांवर अत्याचार होत आहेत. कधी बिहारमध्ये तर कधी पश्चिम बंगालमध्ये लोकांच्या हत्या होत आहेत. गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार माजला आहे. या सगळ्यामुळे देश संकटात सापडला आहे. या संकटांना दुसरे तिसरे कोणीही नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे जबाबदार आहेत.

माझ्यावर हिंदू विरोधी असल्याची टीका होते, आम्ही हिंदू आहोत आणि राहू आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज वाटत नाही असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि एकजुटीनेच या धर्मांध शक्तींसोबत संघर्ष केला पाहिजे तर आपल्याला निश्चितच यश मिळेल असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी सगळ्या विरोधी पक्षांना आणि जनतेला केले आहे.