Mamata Banerjee Phone Call : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ममता बॅनर्जी यांच्यासोबतचा एक दूरध्वनी संवाद शेअर केला आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या निकालाचे वर्णन चोरलेला निकाल आणि निवडणूक आयोगाचा अनैतिक घाणेरडा खेळ असे केले आहे.

भाजपाला झुकते माप

या संवादात ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, मतमोजणीच्या १६ व्या फेरीपर्यंत त्या भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात आघाडीवर होत्या आणि केवळ काही फेऱ्या शिल्लक होत्या. निवडणूक प्रक्रियेत गुंडांनी हस्तक्षेप, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना आणि प्रतिनिधींना घाबरवण्यासाठी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. निवडणूक आयोग, सीआरपीएफ आणि स्थानिक निवडणूक अधिकारी यांच्यावर भाजपाला झुकते माप देण्यासाठी दिल्लीच्या सूचनेनुसार काम केल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. त्यांच्या तक्रारीचा एक मुख्य भाग तृणमूल काँग्रेसच्या (TMC) मोजणी प्रतिनिधींना (counting agents) केंद्रातून हटवून त्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींना बसवण्याबाबत होता.

मतदान केंद्रांतून प्रतिनिधींना बाहेर काढलं

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “उर्वरित फेऱ्या भवानीपूर मतदारसंघातील होत्या जो पूर्णपणे आमचा भाग होता. त्याच वेळी, काही गुंड निवडणूक अधिकाऱ्यांसह मतमोजणी केंद्रात शिरले, त्यांनी मला मारहाण केली आणि सीआरपीएफच्या मदतीने माझ्या प्रतिनिधींना बाहेर काढले.” त्यांनी असाही आरोप केला की, शेवटच्या फेऱ्यांमध्ये मतमोजणी हॉलमध्ये त्यांच्या पक्षाचे कोणतेही प्रतिनिधित्व नव्हते आणि ईव्हीएम (EVM) मशीन व्यवस्थित सीलबंद न करताच स्ट्राँग रूममध्ये नेण्यात आल्या.

“मी हॉलच्या बाहेर आहे, मला आत जाऊ दिले जात नाहीये”, असं त्या म्हणाल्या. या परिस्थितीला छळ म्हणत त्यांनी आरोप केला की, प्रथम SIR च्या माध्यमातून मतदारांना हटवण्यात आले आणि त्यानंतर वीजपुरवठा खंडित करून आणि गोंधळ निर्माण करून त्यांची मते बळजबरीने चोरली गेली. त्यांनी सील न करता ईव्हीएम मशीनची बेकायदेशीर हालचाल आणि मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही आरोप केले. ममता बॅनर्जी यांनी या निकालाचे वर्णन भाजपाचा विजय म्हणून न करता, तो एक अनैतिक घाणेरडा खेळ आणि विरोधकांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “प्रत्येक गोष्टीचे दस्तऐवजीकरण केले असून याला कायदेशीर आव्हान दिले जाईल.” त्यांनी असेही सांगितले की पुरावे गोळा केले आहेत आणि कल्याण बॅनर्जी यांना वकील म्हणून या तथ्यांची माहिती दिली जात आहे.