Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत टीएमसी पक्षाचा दारूण पराभव केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अखेर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाला बरखास्त केलं. या सर्व घडामोडींवरून भाजपा आणि टीएमसीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याने पश्चिम बंगालचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या सातत्याने भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. आता ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘भाजपाला काही दिवसांत दिल्लीच्या सत्तेवरून हटवलं जाईल’, असा मोठा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “भाजपाला लवकरच दिल्लीतील सत्तेतून हटवलं जाईल. आता पश्चिम बंगालमध्ये नव्याने स्थापन झालेल्या भाजपाच्या सरकारकडून अल्पसंख्याक समुदाय आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. अनेक विक्रेत्यांचे स्टॉल्स बुलडोझरने पाडले जात आहेत.”

तसेच पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आणि बेकायदेशीर अतिक्रमणांवरील कारवाईच्या घटनांचा उल्लेख करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “भाजपाचं सरकार आमच्या घटनात्मक विचारांशी आणि मूल्यांशी छेडछाड करत आहे. मात्र, देशातील सत्ताधारी एनडीएचं नेतृत्व करणारा भारतीय जनता पक्ष येत्या काळात केंद्रातील सत्ता गमावेल. येत्या काही दिवसांत भाजपाला दिल्लीच्या सत्तेवरून हटवलं जाईल”, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

अभिषेक बॅनर्जी यांचं भाजपाला आव्हान

ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीला टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता महानगरपालिकेच्या एका निर्णयावरून जोरदार टीका केली. अभिषेक बॅनर्जी यांना कोलकातामधील त्यांच्या घरातील अनधिकृत भाग पाडण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. त्याबाबत अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “त्यांना जे करायचं आहे ते करू द्या. माझं घर पाडा, मला नोटीस पाठवा. पण तरीही मी कोणत्याही गोष्टींपुढे झुकणार नाही. काही झालं तरी भाजपाच्या विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.”

Mamata Banerjee BJP Delhi Government

ममता बॅनर्जी यांचा पराभव

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पाच वर्षांपूर्वी पराभव केला होता. त्याच सुवेंदू अधिकारी यांनी २०२६ च्या निवडणुकीत पुन्हा तोच विक्रम करत ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा पराभव केला. नंदीग्राममध्ये पराभव झाल्यानंतर याच भवानीपूर मतदारसंघाच्या मदतीने ममता बॅनर्जी विधानसभेत पोहोचल्या होत्या. पण आता त्यांना भवानीपूरही गमवावं लागलं.

सुवेंदू अधिकारी कोण आहेत?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत झाली. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांची लढत लक्षवेधी ठरली. अवघ्या देशाचं लक्ष या जागेवर होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाला. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि नंदिग्राम मतदारसंघातूनही ते विजयी झाले.

सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठित राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखलं जातं.

Mamata Banerjee BJP Delhi Government:

पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना काय आदेश दिले?

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या आगामी भूमिकेबाबत मार्गदर्शन केलं. तसेच जे नेते, जे पदाधिकारी पक्षांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत, त्याच्याबाबत ममता बॅनर्जी यांनी मोठं भाष्य केलं. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पत्करून आता आपली संघटना पुन्हा उभी राहील. पक्षाची पुनर्बांधणी आपल्याला करायची आहे. पण जर कोणी तृणमूल काँग्रेस सोडण्यास इच्छुक असेल तर ते स्वतंत्र आहेत. जे इतर पक्षांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना जाऊ द्या. मी स्वत: पक्षाची पुनर्बांधणी करेन. जे पक्षातच राहणार आहेत, त्यांना मी सांगते की, आपल्या पक्षाचे नुकसान झालेले जे कार्यालये आहेत, ते पुन्हा बांधा. त्यांना रंगवा आणि पुन्हा सुरू करा. गरज पडल्यास मी देखील येईल. तृणमूल काँग्रेस कधीही झुकणार नाही. जनतेचा कौल लुटला गेला आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.