“नरेंद्र मोदी या देशातील सर्वात मोठे दंगाबाज; ट्रम्प यांच्यापेक्षाही….”; ममता बॅनर्जी आक्रमक

मोदींच्या टीकेला ममता बॅनर्जींनी दिलं उत्तर

पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते एकमेकांवर आक्षेपार्ह टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोलाबाज अशी टीका केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना उत्तर किलं असून दंगाबाज म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी यांचा उल्लेख दंगाबाज आणि दैत्य असं केला होता.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठे दंगाबाज आहेत,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. हुगली येथे आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यानिमित्ताने सध्या ममता बॅनर्जी जोरदार प्रचार करत आहेत. यानिमित्ताने काँग्रेस आणि तृणमूल एकमेकांवर आरोप, टीका करत आहेत.

इतकंच नाही तर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची परिस्थिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभूत झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही वाईट असेल असंही ते म्हणाले आहेत. “विधानसभा निवडणुकीत मी गोलकिपर असेन आणि भाजपाला एकही गोल करता येणार नाही,” असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी रूजिरा यांची कोळसा चोरी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी चौकशी केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे. “तुम्ही माझी हत्या करु शकता, मारहाण करु शकता. पण तुम्ही एका महिलेचा अपमान करु शकता? माझ्या घरातील सुनेचा? आणि तिला कोळसाचोर म्हणता”, असा संताप ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mamata banerjee calls pm dangabaaz says fate worse than trump awaits sgy