विधानसभेच्या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तब्बल ५९ आमदार आणि २० खासदार फुटले आहेत. एवढंच नाही तर फुटीर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या ऋतब्रता बॅनर्जी यांच्या गटाने तृणमूल काँग्रेसच्या कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयाचा ताबा देखील घेतला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ममता बॅनर्जी यांनी आता तृणमूल काँग्रेसच्या बंडखोरांचा उल्लेख गद्दार असा करत बंडखोर नेत्यांना खुलं आव्हन दिलं आहे. ‘गद्दारांनो, तुम्ही भाजपामध्ये सामील व्हा आणि मग माझ्याशी लढा’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षात फूट पाडण्यासाठी हे बंडखोर भाजपाबरोबर मिळून काम करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. हिंमत असेल तर उघडपणे भाजपामध्ये सामील होण्याचं आव्हान ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांना दिलं.

“तृणमूल काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्या विश्वासघातकी गद्दारांनी थेट भारतीय जनता पक्षात सामील व्हावं. त्यानंतर जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्याशी लढा’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“तुम्ही स्वतःला बंडखोर म्हणवून घेता? मग निवडणुकीच्या आधी तुमचं बंड कुठं होतं? १५ वर्षांत जेव्हा तुम्ही टीएमसीच्या तिकिटावर खासदार आणि आमदार होत आलात, मंत्री व इतर महत्त्वाच्या पदांवर काम करत होतात, तेव्हा तुमचा विरोध कुठे होता? तेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन तुमचं मतभेद का मांडले नाहीत?”, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.

‘निष्ठवान कार्यकर्तेच पक्षाची खरी संपत्ती’ : ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाची खरी संपत्ती असं म्हणत ज्यांनी पक्षाशी विश्वासघात केला आणि पक्ष सोडला. ज्या जनतेने त्यांना मतं दिली, त्यांच्याशी तरी किमान बंडखोरांनी विश्वासघात करू नये”, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

‘बंडखोरांनी विश्वासघात केला’ : ममता बॅनर्जी

दरम्यान, रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “बंगालमधील जनता अशा विश्वासघातकी लोकांना चांगलंच ओळखते. मला पक्षाच्या चिन्हाची पर्वा नाही. पण तरीही हे मला माहिती आहे की ते चिन्ह हिरावून घेऊ शकणार नाही. त्यांना यश मिळणार नाही, कारण मी ते चिन्ह गळ्यात घालून लोकांपर्यंत पोहोचेन. अनेकांनी पक्षाशी विश्वासघात केला आणि ते सोडून गेले. मी त्यांच्या उमेदवारी अर्जांवर स्वाक्षरी केली होती, म्हणून ते जिंकले होते. पण आता भाजपाच्या सांगण्यावरून त्यांनी गद्दारी केली”, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांना सुनावलं आहे.