पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव आणि सध्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या अलपान बंडोपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र त्यांच्या पत्नी सोनाली चक्रवर्ती यांना प्राप्त झालंय. अलपान यांना जीवे मारण्यात येईल आणि त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असं त्या पत्रात लिहिलं असल्याचं म्हटलं जातंय. सोनाली चक्रवर्ती यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपान बंडोपाध्याय, सध्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नीला एक धमकीचे पत्र मिळाले असून त्यात अलपान बंडोपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्या पत्नी सोनाली चक्रवर्ती या कोलकाता विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. त्यांना मिळालेल्या पत्रात त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मॅडम, तुमच्या पतीची हत्या केली जाईल आणि तुमच्या पतीचा जीव कोणीही वाचवू शकणार नाही, असे या पत्रात लिहिले होते. याप्रकरणी कोलकाता पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून आरोपीचां शोध सुरू आहे.

अलपान बंडोपाध्याय हे शांत व्यक्तीमत्वाचे असून ते फारसे न बोलण्यासाठी ओळखले जातात. ते पश्चिम बंगाल कॅडरचे १९८७ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अलपान बंडोपाध्याय हे त्यांच्या मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळात नियमानुसार काम करण्यासाठी ओळखले जातात. ते करोनाच्या आढावा बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील दुवा होते. उत्तम वक्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंडोपाध्याय यांचा राजकीय वर्तुळात दोन्ही बाजूंनी आदर केला जातो. जरी ममता सरकारचे राज्यपालांशी वादविवाद सुरू असले तरी राज्यपाल जगदीप धनखर यांचे बंडोपाध्याय यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत.