पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सोमवारी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील ‘बंग भवना’बाहेर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद झाला. पश्चिम बंगालमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेमुळे बाधित झालेल्या आणि तृणमूल काँग्रेसने दिल्लीत आणलेल्या कुटुंबांचा पोलिसांकडून छळ केला जात असल्याचा आरोप यावेळी बॅनर्जी यांनी केला. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी आपण तैनात पोलिसांना दोष देत नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपला रोख असल्याचे स्पष्ट केले. बॅनर्जी या ‘एसआयआर’च्या विषयावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आल्या आहेत. त्या रविवारी दिल्लीत पोहोचल्या. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ‘एसआयआर’चा फटका बसलेल्या सुमारे ५० कुटुंबांना दिल्लीत आणले आहे. ते ‘बंग भवना’सह राज्य सरकारच्या विविध इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. यापैकी काही कुटुंबांना सोमवारी निवडणूक आयोगातील बैठकीला नेण्यात आले.
दरम्यान मुख्यमंत्री बॅनर्जी ‘बंग भवना’त पोहोचल्या तेव्हा तेथे अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्तावरून त्यांचा दिल्ली पोलिसांशी वाद झाला. वाद सुरू असताना ‘एसआयआर’प्रभावित कुटुंबांप्रति संवेदनशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘‘बंग भवनात बंगालमधील लोकांना धमकावले जात आहे, आमचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. निवडणूक आयोगात आमची बैठक आहे. आम्ही अधिकृतपणे येथे आलो आहोत. काही जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही का?” असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
साकेत गोखले यांचाही वाद
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले, डोला सेन, काकोली घोष दस्तीदार आणि बापी हलदार यांनी ही कुटुंबे थांबलेल्या ठिकाणी धाव घेतली. खासदार गोखले यांचा पश्चिम बंगाल विद्युत विकास महामंडळाच्या अतिथिगृहाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांशी वाद झाला. या वादानंतर तेथील बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची बस हटवण्यात आली आणि पोलिसांची संख्याही कमी केली.
बंगालमधील नागरिक निवडणूक आयोगाकडे आपली बाजू मांडण्यासाठी आले आहेत; मात्र त्यांना धमकावले जात आहे. बंग भवनच्या आवाराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त का तैनात करण्यात आला? या प्रकरणात पोलिसांना दोष देत नाही वरिष्ठ पातळीवर असलेले यात दोषी आहेत. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

