पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वजन वाढलेल्या आपल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बैठकीत सहभागी झालेल्या या कार्यकर्त्यामधील आणि ममता बॅनर्जींमधील संवादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून चांगलाच चर्चेत आहे. कार्यकर्ता बोलत असताना ममता बॅनर्जी यांनी त्यांना थांबवत, “ज्याप्रकारे तुमचं पोट वाढत चाललं आहे ते पाहता कधीही खाली कोसळू शकता, तुम्हाला बरं वाटत नाहीये का?,”अशी विचारणा केली.

ममता बॅनर्जींच्या या प्रश्नामुळे अजिबात नाराज न झालेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला साखरेचा किंवा रक्तदाबाचा अजिबात त्रास नसून एकदम तंदरुस्त असल्याचं सांगितलं. यापुढील काही क्षण ते पक्षाच्या प्रमुखांना आपण कशा पद्धतीने व्यायाम करतो हे पटवून देत होते.

ममता बॅनर्जीदेखील या मुद्द्यावरुन मागे हटत नव्हत्या. “नक्कीच काहीतरी समस्या आहे. इतका मोठा मध्य प्रदेश कसा काय असू शकतो,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. यानंतरही ममता बॅनर्जींकडून उलट तपासणी सुरु होती.

ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये झालेलं संभाषण

ममता बॅनर्जी – तुम्ही चालता का?
कार्यकर्ता – रोज
ममता बॅनर्जी – तुम्ही जास्त खाता का?
कार्यकर्ता – मी रोज सकाळी भजी खातो, सवयीचा भाग झाला आहे
ममता बॅनर्जी – तुम्ही रोज भजी का खाता? अशाप्रकारे तुम्ही वजन कमी करु शकत नाही
कार्यकर्ता – पण मी रोज तीन तास व्यायामदेखील करतो.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी प्रात्यक्षिक दाखवा सांगितलं असता त्यांनी दिवसाला १००० कपाल भारती करतो असं सांगितलं.

यावर ममता बॅनर्जी यांनी शक्यच नाही असं म्हटलं. जर तुम्ही मला आता १००० कपाल भारती करुन दाखवले तर लगेच १० हजार रुपये देईन असं सांगत ममता बॅनर्जी यांनी हे अशक्य असून तुम्हाला श्वास कसा आता घ्यायचा आणि बाहेर सोडायचा हे माहिती नाही असं म्हटलं.