Mamata Banerjee Reaction Asish Banerjee death news : पश्चिम बंगालमध्ये पाच टर्म आमदार राहिलेले तृणमूल काँग्रेसचे नेते आशिष बॅनर्जी यांनी आज बिरभूम येथील पक्षाच्या कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली. मी कोणताही भ्रष्टाचार केला नसून बदनामी आणि मानहानी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं. दरम्यान, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निधनाप्रती शोक व्यक्त केला आहे.

मानसिक त्रास दिला

ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, आशिष बॅनर्जी हे अत्यंत जमिनीशी जोडलेले आणि आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील जनतेशी घनिष्ठ नाते असलेले नेते होते, असं असतानाही त्यांची नाहक बदनामी करण्यात आली, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लादण्यात आले आणि त्यांच्यावर सतत मानसिक दबाव निर्माण केला गेला.

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “या दुर्घटनेचं सर्वात मोठं दुःख हे आहे की, आपल्या शेवटच्या दिवसांत त्यांना प्रचंड मानसिक आणि भावनिक त्रासाला सामोरं जावं लागलं. पाच वेळा आमदार, माजी उपसभापती आणि अध्यक्ष म्हणून आशिष दा यांनी रामपूरहाटच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं आणि जनतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली होती. परंतु, त्यांनी केलेल्या अफाट कामानंतरही त्यांना वारंवार लक्ष्य करण्यात आलं, त्यांची बदनामी केली गेली, खोटे आरोप लावले गेले आणि त्यांच्यावर सतत दबाव आणला गेला.”

आत्मपरीक्षण करण्याची गरज

सत्ताधारी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी पुढे म्हटलं, “दीर्घकाळ सार्वजनिक सेवा करूनही त्यांना ज्या प्रकारचा छळ आणि मानसिक दबावाचा सामना करावा लागला, ते पाहता राजकारणातील सततच्या वाढत्या शत्रुत्वामुळे माणसाला मोजावी लागणारी किंमत किती मोठी असू शकते, यावर आपण सर्वांनी थांबून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”

ममता बॅनर्जी यांनी आशिष बॅनर्जी यांचा गौरव करताना म्हटलं की, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यापन क्षेत्रात आणि जनसेवेत समर्पित केलं होतं. शेवटी, त्यांची उणीव नेहमीच भासत राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.