Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं घटना काय घडली?
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या घरी भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी दाखल झाल्या होत्या. मात्र, यावेळी काही जणांनी ममता बॅनर्जी यांच्या ताफ्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी ममता बॅनर्जी यांच्या वाहनांवर दगड आणि चिखल व चपला फेकण्यात आल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवेळी नागरिकांनी ‘चोर, चोर’ अशी जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
#WATCH | Barrackpore: Former West Bengal Chief Minister Mamata Banerjee says, "Large stones were hurled at my car by anti-social elements,right in front of the police. The attack on the vehicle was so severe that if the windows had been open, my head would have been split open.… pic.twitter.com/PIdFM1Oxcr
— ANI (@ANI) August 9, 2026
ममता बॅनर्जी यांनी काय प्रतिक्रिया दिली?
“पोलिसांच्या समोरच काही समाजकंटकांनी माझ्या कारवर मोठे दगड फेकले. हा हल्ला एवढा तीव्र होता की, जर गाडीच्या खिडक्या उघड्या असत्या तर माझं डोकं फुटलं असतं. आम्ही सर्वजण गंभीर जखमी झालो असतो. हे सर्व पोलिसांच्या समोर घडलं आहे. अशा प्रकारच्या घटना याआधी मी कधीही पाहिल्या नाहीत. सध्या पश्चिम बंगालमध्ये हे काय चाललंय? पोलीस फक्त भाजपाला संरक्षण देत आहेत”, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
दरम्यान, याआधी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर दगडफेक करत हल्ला झाल्याची घटना घडल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
