केंद्रीय निवडणूक आयोगात फूट पडल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या निर्णयासह आणखी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिल्यानंतर देशभरातून ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका होत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांमधील अंतर्गत मतभेदांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या घडामोडी दरम्यानच बंगालमधील कट्टर प्रतिस्पर्धी टीएमसी आणि सीपीआय-एम (CPI-M) हे राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय-एम यांनी संवादाचे मार्ग खुले केले आहेत.
हे दोन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्यात कोणताही औपचारिक संवाद किंवा संपर्क नव्हता. पण आता ममता बॅनर्जी आणि ‘सीपीआय-एम’चे सरचिटणीस एम.ए.बेबी यांच्यात शुक्रवारी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
ममता बॅनर्जींची विरोधी पक्षाच्या नेत्यांची चर्चा
ममता बॅनर्जी आणि एम.ए.बेबी यांच्यात निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीची विश्वासार्हता जपण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोहीम राबवण्याच्या आवश्यकतेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली आहे. इंडिया आघाडीची बैठक पुढील आठवड्यात बोलावण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन
सीपीआय-एमच्या सरचिटणीसांनी ममता बॅनर्जी यांना आणि इंडिया आघाडीतील पक्षांना व भाजपा विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाशी संबंधित घडामोडींवर चर्चा करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनानंतर दोन दिवसांनी ममता बॅनर्जी आणि एम.ए.बेबी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे.
सीपीआय-एमच्या सरचिटणीसांनी काय म्हटलं?
“तुम्हाला कल्पना असेल की २३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘द इंडियन एक्सप्रेस’ची एक बातमी समोर आली आणि त्यामधून निवडणूक आयोगाच्या हुकूमशाही कारभाराचं स्वरूप उघड झालं आहे. ही खरोखरच एक असाधारण परिस्थिती असून जिथे निवडणूक आयोग आणि लोकशाहीची देखील विश्वासार्हता पणाला लागली आहे. आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आम्ही उपस्थित केलेले सर्व आक्षेप डावलून एसआयआर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुले १३ कोटींपेक्षा जास्त मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात आहे”, असा आरोप सीपीआय-एमचे सरचिटणीस एम.ए.बेबी यांनी केला आहे.
इंडिया आघाडीत नसलेल्या पक्षांनाही आवाहन
सीपीआय-एमचे सरचिटणीस एम.ए.बेबी यांनी इंडिया आघाडीत नसलेल्या पक्षांनाही जसं की, बीआरएस, आप, द्रमुक, टीव्हीके, बीजेडीसह आदी पक्षांना पत्रे लिहिली आहेत.
