पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे. त्या पार्श्वभूमिवर ममता बॅनर्जी गोव्यात आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “गोवा आणि पश्चिम बंगालला फुटबॉल आवडतो. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आमचा नारा ‘खेला होबे’ होता. यावेळी आम्हाला गोव्यात नवी पहाट पहायची आहे. ममता गोव्यात नवीन पहाट कशी करणार, असं म्हणत असाल तर मी कुठेही जाऊ शकते. माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे,” असं ममता बॅनर्जी गोव्यात बोलताना म्हणाल्या.

“माझं शेतकऱ्यांवर, मच्छिमारांवर, इथल्या खाणींवर आणि संपूर्ण गोव्यावर प्रेम आहे. मी पहिल्यांदाच राजकीय हेतूने गोव्यात आलेली नाही. मी यापूर्वी देखील गोव्याला भेट दिली आहे. मी तीन वर्षांपूर्वी गोव्याला आले होते. मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मी इथे तुमच्या राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी आलेली नाही. लोकांना अडचणी येतात तेव्हा आपण त्यांना मदत करू शकलो, तर त्याचा मला आनंद आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही तुम्हाला प्रक्रियेत मदत करू,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, ममता बॅनर्जी आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी प्रियोल, पोंडा येथे साडेतीन वाजता मंगुशी मंदिराला भेट देतील. त्यानंतर चार वाजता मर्डोल, पोंडा येथील श्री महालसा नारायणी मंदिरालाही त्या भेट देतील. नंतर त्या कुंडाईम, पोंडा येथे तपोभूमी मंदिराला भेट देतील.