पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगालच्या निवडणूक यादीत बाहेरील लोकांना बेकायदा समाविष्ट करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला. या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.
फॉर्म क्रमांक ६च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे. हा प्रकार भाजपकडून निवडणूक आयोेगाच्या संगनमताने केला जात असून लोकशाही हक्कांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
यासंदर्भात तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी दावा केला होता की, एका दिवसात सुमारे ३० हजार फॉर्म ६ भाजपकडून सादर करण्यात आले असून, इतर राज्यांतील लोकांना पश्चिम बंगालचे मतदार बनवण्याचा प्रयत्न होत आहे.
आयोगाच्या कार्यालयाबाहेर तणाव
मतदारयादीत छेडछाड केल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या मतदान केंद्रस्तरीय कार्यकर्त्यानी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या वेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर वातावरण काहीसे तणावाचे होते. फॉर्म ६ चा चुकीचा वापर करून मतदार नोंदणी केल्याच्या आरोपावरून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यापूर्वीच विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात त्यांनी अशांतता निर्माण केल्याचा आरोप केला होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
बदल्यांना आव्हान देणारी याचिका नामंजूर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना आव्हान देणारी जनहित याचिका कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. आयोगाच्या कारवाईने जनहिताला धक्का बसल्याचे सिद्ध करू शकला नाही, असे मुख्य न्यायाधीश न्या. सुजॉय पॉल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महासंचालक यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
लिएंडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश
नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विख्यात टेनिसपटू लिएंडर पेस याने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर ही केवळ औपचारिकता नसून जबाबदारी आणि देशसेवेची मोठी संधी असल्याने त्याने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. लिएंडर पेस हे आता भाजपच्या व्यासपीठावरून राजकारणात मोठी इनिंग खेळतील असे मंत्री रिजिजू म्हणाले. यावेळी भाजपचे नेते सुकांता मुजुमदार, अरूण सिंग, अनिल बालुनी उपस्थित होते.
