बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महाविद्यालयीन युवतीच्या कुटुंबीयांची भेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली. मात्र या वेळी त्यांना तेथील ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले. या दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ममता यांच्यासमोर निदर्शने केली. या रोषाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांचा तोलही अखेर ढळला.
दहा दिवसांपूर्वी येथे राहणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी गेल्या असताना तेथे त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यातील एका प्रश्नाचे उत्तर देताना या बलात्कारामागे तसेच आपल्या भेटीदरम्यान करण्यात येत असलेल्या निदर्शनांमागे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप ममतांनी केला. अशा दुर्घटनांचे राजकारण करताना तुम्हाला लाज वाटत नाही का, असा सवालही त्यांनी ग्रामस्थांना केला.
कम्युनिस्ट पक्षाने ममतांच्या आरोपास प्रत्युत्तर देताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यात मुख्यमंत्र्यांना रस असणे ही शोचनीय आणि निंद्य बाब आहे, असे म्हटले आहे.