गेल्या काही दिवसांपासून देशात पेगॅसस प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. देशातील अनेक राजकीय नेते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने हॅक केले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. केंद्रानं हा आरोप फेटाळला असला, तरी त्यावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने ७ राज्यांमधील तृणमूलच्या कार्यकर्त्यांशी ममता बॅनर्जी यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

“कुठे आहे पीएम केअर फंड?”

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर तीव्र शब्दांत टीका देखील केली. “३.७ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमधून गोळा केले आहेत. हा पैसा ते कुठे खर्च करत आहेत. लोकांना लस, औषधं मिळत नाहीयेत. पीएम केअर फंड कुठे आहे?”, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

“या सरकारला देखील प्लास्टर लावलं पाहिजे”

दरम्यान, पेगॅससच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी केंद्राला खोचक टोला लगावला आहे. “आता पेगॅसस आलंय. मी तर माझा फोन प्लास्टर करून टाकला आहे. कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड केलं जात आहे. काय करणार? कॅमेरा, ऑडिओ, व्हिडीओमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेतलं जातं. त्यामुळे मी पूर्ण कॅमेऱ्यालाच प्लास्टर लावून टाकलं. या केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल. कुणावरच विश्वास राहिलेला नाही. केंद्र सरकारमध्ये देखील त्यांच्या मंत्र्यांचे फोन देखील हॅक केले जात आहेत”, असं त्या म्हणाल्या.

फोन टॅपिंग : जबाबदार कोण?, आदेश कोणी दिले हे जनतेला कळलं पाहिजे : अजित पवार

“लोकशाही तीन घटकांची मिळून बनते. प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग. पेगॅससने या तिघांनाही निगराणीखाली आणलं आहे. येत्या २७ आणि २८ जुलै रोजी मी दिल्लीमध्ये असणार आहे. जर केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची बैठक बोलावली गेली, तर मी त्यासाठी दिल्लीत उपलब्ध असेन”, असं देखील त्यांनी यावेळी सांगताना विरोधी पक्षांना एकत्र येऊन बैठक घेण्याचं आवाहन केलं.