Bengal Bypolls : पश्चिम बंगालमध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर पक्षात फूट पडली, त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. जवळपास ५९ आमदार आणि २० खासदार फुटले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागत आहे.
यातच आता पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीच्या दोन २ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी नंदिग्राम विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. एवढंच नाही तर टीएमसीचे बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांनी थेट ममता बॅनर्जी यांना ऑफर देत जर ममता बॅनर्जी नंदिग्राम विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असतील तर आपण उमेदवार उभा करणार नाही, असं जाहीर केलं होतं.
दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांनाही असं वाटत होतं की ममता बॅनर्जी या ही पोटनिवडणूक लढवतील. मात्र, ममता बॅनर्जी या नंदीग्राममधील पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं आज पक्षाने जाहीर केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
तृणमूल काँग्रेसने अधिकृत निवेदन जारी करत नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नंदीग्रामसाठी संचिता प्रधान (डे) आणि रेजीनगरसाठी रबिउल आलम चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
दरम्यान, गेल्या १५ वर्षांत ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेबाहेर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०११ मध्ये भवानीपूर पोटनिवडणुकीद्वारे त्या विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यानंतर २०१६ तसेच २०२१ च्या पोटनिवडणुकीतही त्यांनी ती जागा जिंकली होती. भवानीपूरमधून लढताना बॅनर्जी यांचा भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडून १५,१०५ मतांनी पराभव झाला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही अधिकारी यांनीच त्यांना नंदीग्राममध्ये पराभूत केलं होतं. २०२६ मध्ये नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागा सुवेंदू अधिकारी यांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे अधिकारी यांनी भवानीपूरची जागा स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि नंदीग्रामच्या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे नंदीग्रामची जागा रिक्त झालेली आहे. आता याच जागेसाठी निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
