Mamata Banerjee Niece Death: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची बृष्टी मुखर्जीचा मृतदेह आढळून आला आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. बृष्टी ही ममता बॅनर्जी यांचे चुलत भाऊ निहार मुखर्जी यांची मुलगी होती.
नोकरी गमावल्यानंतर टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा
पश्चिम बंगालमधील भरती घोटाळ्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर बृष्टीची नोकरी गेल्याचे सांगितले जात आहे. बीरभूम जिल्ह्यातील कुसुंबा गावातील घराच्या दुसऱ्या मजल्यावर २८ वर्षीय बृष्टीचा मृतदेह आढळून आला. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर बृष्टीच्या मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे कोर्टाचे आदेश
पश्चिम बंगालमध्ये २६,००० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे आणि कथित पैशांच्या देवाणघेवाणीद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपावरून सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. कलकत्ता उच्च न्यायालयाने या नियुक्त्या रद्द केल्या होत्या आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील हा निर्णय कायम ठेवला होता. यात बृष्टि मुखर्जी यांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नोकरी गमावली होती.
गाजलेला कॅश फॉर जॉब स्कॅम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या निर्णयानंतर बृष्टि नैराश्यात होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोकरी गमावलेल्या उमेदवारांच्या यादीत बृष्टि यांचे नाव ६०८ व्या क्रमांकावर होते. सर्वोच्च न्यायालयानेही नंतर हा आदेश कायम ठेवला होता. दरम्यान, बृष्टी यांच्या कुटुंबीयांनी आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता असा दावा त्यावेळी केला होता. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात स्कूल सर्व्हिस कमिशनने २०१६ मध्ये कॅश फॉर जॉब स्कॅम गाजला होता. बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील हा एक मोठा भ्रष्टाचार मानला जातो. या घोटाळ्यात पश्चिम बंगालचे तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी, सत्ताधारी पक्षाचे काही आमदार तसेच स्कूल सर्व्हिस कमिशन आणि शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
