पीटीआय, कोलकाता
आगामी विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि जनगणनेच्या निमित्ताने लोकांचे नागरिकत्व काढून घेण्याचा कट केंद्र सरकार रचत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. नागरिकांनी अशा प्रयत्नांबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी राज्यात बेकायदा राष्ट्रपती राजवट लागू आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मदतीने केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचनेची (सीमांकनाची) आखणी करत आहे.
आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला अनुकूल वातावरणासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील अधिकाऱ्यांची बदली केल्याचा आरोप ममता यांनी केला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतून एका विशिष्ट समुदायातील नागरिकांनाच लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
