Mamata Banerjee Willing To Resign Kolkata Doctors Protest : कोलकाता येथील आर. जी. कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे, तसेच पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादळ घोंगावत आहे. अशाततच पीडितेच्या नातेवाईकांसह रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठं आंदोलन उभारून पश्चिम बंगाल सरकारला घेरलं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून योग्य सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण दाबण्याकरता पीडितेच्या कुटुंबाला व इतरांना पैशांचं आमिष दाखवल्याचाही आरोप होत आहे.
दरम्यान, आंदोलक डॉक्टरांची भेट घ्यायला गेलेल्या ममता बॅनर्जी यांना कोणीही भेटायला आलं नाही. बॅनर्जी तब्बल दोन तास पीडितेचं कुटुंब, नातेवाईक व आंदोलक डॉक्टरांची वाट पाहत होत्या. परंतु, त्यांच्यासमोर रिकाम्या खुर्च्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हतं. बराच वेळ वाट पाहून त्या निघून गेल्या.
ममता बॅनर्जी सरकारने आंदोलक डॉक्टरांना तिसऱ्यांदा बैठकीसाठी बोलावलं होतं. मुख्यमंत्र्यांनी नबन्नाच्या सभागृहात बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र डॉक्टरांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलंच नाही. या चर्चेचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. परंतु, ही मागणी ममता बॅनर्जी यांनी मान्य केली नाही. त्यामुळे त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. सभागृहातून बाहेर पडताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, न्यायासाठी मी माझी खुर्ची सोडण्यास तयार आहे.
ममता बॅनर्जी यांनी माफी मागत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी जनतेची माफी मागितली. तसेच त्या म्हणाल्या, “लोकांच्या हितासाठी मी राजीनामा देण्यास तयार आहे”. दुसऱ्या बाजूला आंदोलकांनी म्हटलं आहे की “सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोवर हे आंदोलन असंच चालू राहील”.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी ज्युनियर डॉक्टरांबरोबर चर्चा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी तीन दिवस त्यांची वाट पाहिली. त्यांनी एकदा यावं आणि त्यांच्या समस्या सांगाव्या. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नाकारला आहे. मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. मी देश आणि राज्यातील लोकांची माफी मागते. ज्यांना वाटतंय त्यांनी या आंदोलनाचं समर्थन करावं, माझी काहीच हरकत नाही. मला वाटतं की सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार डॉक्टरांनी आता त्यांच्या कर्तव्यावर परत जायला हवं.