पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ही पश्चिम बंगालची झाली. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवलं असून आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत टीएमसीला मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचाही पराभव झाला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली आहे, तर मी राजीनामा का देऊ?’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
“मला अतिशय खेदाने हे सांगावं लागत आहे की लोकांचे घटनात्मक हक्क आणि ईव्हीएम लुटून निवडणूक आयोग या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत खलनायक बनलं आहे. मला सांगा मतदानानंतर ईव्हीएम ८० ते ९० टक्के चार्ज कसे? हे जरा तुम्ही मला सांगू शकाल का? खरंच हे कसं शक्य आहे?”, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
“पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यांनी आमच्या अनेक लोकांना अटक करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी त्यांनी छापे टाकले. एवढंच नाही तर अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांनाही बदललं, त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांना त्या ठिकाणी नेमलं आणि भाजपाने थेट निवडणूक आयोगाशी संगनमत करून हा खेळ खेळला. भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यातील हा खेळ आहे. मात्र, तरीही आम्ही संपूर्ण यंत्रणेविरुद्ध लढलो”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री देखील यामध्ये सामील असून थेट हस्तक्षेप करत आहेत. त्यांनी एसआयआरच्या माध्यमातून तब्बल ९० लाख नावं वगळली आहेत. त्याविरोधात जेव्हा आम्ही न्यायालयात गेलो, तेव्हा ३२ लाख नावांचा त्यात समावेश करण्यात आला. त्यांनी घाणेरडं आणि नीच राजकारण केलं. मी माझ्या आयुष्यात अशा प्रकारची निवडणूक कधीही पाहिली नाही”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांनी मला फोन केले. इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी मला सांगितलं की ते पूर्णपणे माझ्याबरोबर आहेत. मला विश्वास आहे की आगामी काळात आपली एकता आणखी मजबूत होईल. माझं ध्येय अगदी स्पष्ट आहे की मी एका सामान्य व्यक्तीप्रमाणे इंडिया आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन. आता माझ्याकडे खुर्ची नाही म्हणून मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे तुम्ही मला असं म्हणू शकत नाही की मी माझ्या पदाचा गैरवापर करत आहे. मी आता एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी घालवलं आहे. गेल्या १५ वर्षांत मी माझ्या पेन्शनमधून एक पैसाही घेतलेला नाही”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“आम्ही खूप संघर्ष केला. आमचा लढा थेट भाजपाशी होता. निवडणूक आयोग विकलं गेलं, न्यायपालिकेने न्याय नाकारला, एसआयआरच्या नावाखाली एवढ्या लोकांना मतदार यादीतून काढून टाकलं, अधिकारी एकतर्फी वागले, मग तुम्हीच सांगा, मतदान करूनही ईव्हीएम मशीन ८० ते ९० टक्के चार्ज कसे राहिले. जे सहसा ४० टक्क्यांच्या खाली यायला हवे होते? त्यांनी मला मतदान केंद्रात प्रवेश करू दिला नाही. त्यांनी केंद्रीय दल आणि निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत आमच्या कार्यकर्त्यांचा छळ केला. मला बाहेर ढकलण्यात आलं, आमच्या एजंटला मारहाण करण्यात आली”, असे गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केले आहेत.
‘मी राजीनामा देणार नाही’
“मी राजीनामा देणार नाही. कारण मी निवडणूक हरलेली नाही. मी राजभवनात जाणार नाही. कारण हा प्रश्नच उद्भवत नाही. मला हेही सांगायचं आहे की आम्ही निवडणुका हरलेलो नाही. हा आम्हाला पराभूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाशी संगनमत करून ते आम्हाला पराभूत करत असतील, पण नैतिकदृष्ट्या आम्ही निवडणुका जिंकल्या आहेत”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
