पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि टीएमसी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याच्या घटनाही घडल्या. यानंतर आज (३० मे) टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकत त्यांचा शर्ट फाडण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप टीएमसी पक्षाकडून करण्यात आला आहे. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील सोनारपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र, या दौऱ्यादरम्यान काही स्थानिक व्यक्तींनी ‘चोर, चोर’ अशी जोरदार घोषणाबाजी करत अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर सोनारपूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर आता पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यकर्तेच हत्यारे बनले आहेत, भाजपाला लाज वाटायला पाहिजे”, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत पश्चिम बंगालमधील भाजपाच्या सरकारवर टीका केली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची घटना कशी घडली?

दरम्यान, पश्चिम बंगालमधील सोनारपूर या ठिकाणी अभिषेक बॅनर्जी हे निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी ते चालत जात असताना काही जणांच्या जमावाने खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला. यावेळी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकण्यात आली, तसेच दगडफेक करण्यात आली आणि त्यांचा शर्ट फाडण्याचा प्रयत्न करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्या व्हिडीओमध्येही काही जणांच्या जमावाने अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकत मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे तणाव वाढल्यानंतर अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अभिषेक बॅनर्जी यांना संरक्षण देत आणि हॅल्मेट देत घटनास्थळावरून सुरक्षितस्थळी नेल्याचं सांगितलं जात आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले?

सोनारपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं की, “ही घटना भारतीय जनता पक्षाने घडवून आणली आहे. हे सर्व भाजपानेच घडवलं आहे. बघा त्यांनी काय केलं? हे त्यांच्या लोकशाहीचं उदाहरण आहे. त्यांची सत्ता येऊन एक महिना देखील उलटलेला नाही, आता पोलीस कुठेच दिसत नाहीत. त्यांना मला मारायचं होतं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आम्ही निश्चितपणे उच्च न्यायालयाला या घटनेची माहिती देऊ. आम्ही राज्यपालांनाही या घटनेची माहिती देऊ. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत”, असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

‘तुम्ही माझा गळा कापला तरी…’

दरम्यान, टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना एका कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणात सीआयडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत बोलताना खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं की, “तुम्ही माझा गळा कापला तरी मला घाबरवण्यासाठी तुम्हाला सात जन्म घ्यावे लागतील.”

टीएमसी पक्षाने काय प्रतिक्रिया दिली?

खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा टीएमसी पक्षाने निषेध केला आहे. तसेच स्वत:वर हल्ला झाला तरीही अभिषेक बॅनर्जी हे हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले. भाजपा समर्थित समाजकंटकांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतरही आमच्या नेत्याने मागे न फिरण्याचा निर्णय घेतला. उलट भाजपा-समर्थित गुंडांनी केलेल्या अकल्पनीय नुकसानीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या पाठीशी आमचे नेते उभे राहिले आहेत. करुणेने प्रेरित राजकारण आणि द्वेषाने प्रेरित राजकारण यातील हाच फरक आहे. आजच्या घटनांनी तुम्ही कोणत्या प्रकारचे राजकारण करता हे पुन्हा एकदा उघड केलं आहे, जे दहशत, हिंसाचार आणि सूडबुद्धीवर आधारित आहे”, असं म्हणत टीएमसी पक्षाने मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर टीका केली आहे.

अखिलेश यादव यांनी घटनेचा निषेध केला

सोनारपूरमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निषेध केला आहे. याबाबत अखिलेश यादव यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत म्हटलं की, “बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणून, बंगालमधील भाजपा सरकारने हे सिद्ध केलं आहे की ते द्वेषपूर्ण, नकारात्मक आणि हिंसक राजकारण करण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाहीत. अशा संवेदनशील वातावरणात पोलिसांची अनुपस्थिती एका मोठ्या कटाकडे निर्देश करते, हे अत्यंत निंदनीय आहे”, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.