पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अभूतपूर्व फूट पडली आहे. पक्षातील बंडखोरीमुळं राजकीय कोंडीत सापडलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या नेहमीच्या ‘स्ट्रीटफायटर’ शैलीत विरोधकांना थेट आव्हान देत ममता म्हणाल्या, “माझा आवाज दाबण्यासाठी किंवा मला रोखण्यासाठी आता तुम्हाला मला जीवेच मारावे लागेल.” पक्षाच्या चिन्हावर दावा सांगणाऱ्या बंडखोरांना त्यांनी थेट ‘गद्दार’ असं संबोधलं असून, तृणमूल काँग्रेसचं अधिकृत चिन्ह आपल्याकडंच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रीमा भट्टाचार्य यांच्या राजीनाम्याने मोठा धक्का!
शनिवारी ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला. त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि तृणमूलच्या बंगाल प्रदेशाध्यक्ष चंद्रीमा भट्टाचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भट्टाचार्य यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या बंडखोर गटाने शुक्रवारीच कोलकाता येथील तृणमूलच्या मुख्य कार्यालयावर ताबा मिळवला होता.
चंद्रीमा यांच्या राजीनाम्यावर बोलताना ममता म्हणाल्या, “चंद्रीमा भट्टाचार्य यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यांनी मला आधीच परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यांचा मुलगा आधीच तृणमूल विरोधी गटात सामील झाल्यामुळे त्या हा निर्णय घेणार होत्या.”
“भाजपसमोर कधीही झुकणार नाही”
बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षात ‘मार्गदर्शक’ (सल्लागार) म्हणून काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र, माजी मुख्यमंत्र्यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. “त्यांना जे करायचे आहे ते करू देत, पण मी बंडखोरांशी कधीही हातमिळवणी करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तपास यंत्रणा आणि राजकीय दबावामुळेच हे आमदार पक्ष सोडून गेले असल्याचा दावा त्यांनी केला. “मी किंवा माझा पक्ष कोणत्याही दबावापुढे आणि भाजपसमोर कधीही झुकणार नाही,” अशी गर्जना त्यांनी केली.
पक्ष कार्यालयाच्या ताब्यावरून संताप
बंडखोरांनी तृणमूलच्या कार्यालयाला लावलेल्या टाळ्यावर ममता बॅनर्जी यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला. “ज्यांनी काल कार्यालयावर ताबा मिळवला, त्यांना मला सांगायचे आहे की, ते कार्यालय आम्ही भाड्याने घेतले होते. ऑक्टोबर २०२७ पर्यंत आमचा करार आहे. एखादी व्यक्ती पक्ष सोडू शकते, पण संस्था संपत नाही. ती पक्षाची मालमत्ता आहे. ‘मा, माती, मानुष’च्या मालमत्तेवर कोणीही जबरदस्तीने ताबा मिळवू शकत नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
“दोन महिन्यांतच गद्दारी कशी केली?”
२०११ मध्ये तब्बल तीन दशकांची डाव्यांची सत्ता उलथवून लावणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी बंडखोर आमदारांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. “पक्षाचे चिन्ह मी दिले आहे. २०२६ च्या निवडणुकीत तुमच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणारी मी होते. निवडणूक होऊन दोन महिनेही झाले नाहीत, तोच तुम्ही गद्दारी केली? याला काही मर्यादा असायला हवी. तृणमूलची विचारधारा भाजपविरोधी आहे आणि सध्या तुम्ही भाजपच्या तालावर नाचत आहात, हे फार काळ चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी बंडखोरांना सुनावले.
पक्षाची धुरा आता पूर्णपणे ममतांच्या हातात
चंद्रीमा भट्टाचार्य यांच्या एक्झिटनंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पक्षाची संपूर्ण सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आहेत. यापुढे त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानातूनच पक्षाचे मुख्य कामकाज चालेल, अशी घोषणा त्यांनी केली.
तृणमूलमधील भगदाड: खरी लढाई पुतण्याविरुद्ध?
बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी गळती सुरू झाली आहे. बंडखोर आमदारांनी ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी खरी नाराजी ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावावर असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत ६० हून अधिक आमदार, २० हून अधिक लोकसभा खासदार आणि किमान ३ राज्यसभा खासदारांनी बॅनर्जी छावणीपासून स्वतःला दूर केले आहे.
राजीनामा दिलेल्या चंद्रीमा भट्टाचार्य यांनी पत्रात लिहिले की, “माझ्या मनात ममता बॅनर्जी यांच्याबद्दल सर्वोच्च आदर कायम राहील. पण जिथे विश्वास उरत नाही, तिथे काम करणे अशक्य होते. म्हणूनच आम्ही राजीनामा देत आहोत.”
आता चेंडू निवडणूक आयोगाकडे
तृणमूल काँग्रेसमधील या मोठ्या फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे, याचा निर्णय आता निवडणूक आयोग करणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ६ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आपले दावे आणि पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात बंगालच्या राजकारणात कायदेशीर आणि राजकीय लढाई अधिक तीव्र होणार हे स्पष्ट आहे.
