Mamata Banerjee on West Bengal Exit Polls: पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडले असून आता ४ मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान २९ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज हाती आले. सात पैकी चार एक्झिट पोल्सनी पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. भाजपा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना संबोधित करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ४ मे रोजी निकालानिमित्त मतमोजणी केंद्रावर २४ तास पहारा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी एक्झिट पोल्सचे कलही फेटाळून लावले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाला २२६ पेक्षा अधिक जागा मिळतील आणि टीएमसीचा मोठा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
व्हिडीओ संदेशात ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेला आवाहन करते की, त्यांनी एकजूट दाखवावी. आजपासूनच मतमोजणी प्रक्रियेवर सर्वांनी बारीक लक्ष ठेवावे. गरज पडल्यास मी स्वतः माझ्या (भवानीपूर) मतदारसंघात पहारा देण्यासाठी बाहेर पडेन.”

फक्त कार्यकर्तेच नाही तर पक्षातील नेत्यांनीही पहारा देण्यासाठी उतरावे, असेही त्या म्हणाल्या. “दिवसा तुमच्या कार्यकर्त्यांना पहारा ठेवण्यासाठी कामाला लावा. तर रात्री तुम्ही स्वतः पहारा द्या. जर मी पहारा देण्यासाठी जाऊ शकते, तर तुम्हीही देऊ शकता. रात्रभर जागे राहा आणि सकाळी दुसऱ्या पथकाला पहाऱ्याची जबाबदारी सोपवूनच तिथून निघा”, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी नेत्यांना केले आहे.

एक्झिट पोलचे कल फेटाळले
मतदानानंतर दाखविण्यात आलेल्या एक्झिट पोलचे कल ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावले आहेत. भाजपाला लाभ होईल, अशा पद्धतीने वृत्तवाहिन्यांनी पोल दाखवले. यातून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र आमचा पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या मजबूत स्थितीत आहे. टीएमसी पक्ष २२६ पेक्षा अधिक जागा जिंकेल. टीएमसीची गती रोखता येणार नाही, हे भाजपाला चांगले ठाऊक आहे, असेही त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी २०२१ च्या एक्झिट पोल्सचीही आठवण करून दिली. त्यावेळीही भाजपाला लाभ होईल, अशापद्धतीने आकडे दाखवले गेले. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर टीएमसीचा विजय झाला. यावेळीही २०२१ च्या परिस्थितीची पुनरावृत्ती होणार असून २०२६ मध्येही आपलाच मोठा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला. मतमोजणीपूर्वी लोकांमध्ये एक नरेटिव्ह पेरण्यासाठी माध्यमांच्या मदतीने आणि एक्झिट पोल्सच्या आकड्याद्वारे एक वेगळेच चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी पुढे आणखी आरोप केले. त्या म्हणाल्या, भाजपाच्या वतीने वृत्तवाहिन्यांना संदेश पाठविण्यात आले. आपल्याला गुप्त माहिती प्राप्त झाली असून एक्झिट पोलचे अंदाज हे राजकीय हेतून प्रेरित होते. भाजपा आपल्याला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी ही (भाजपा) माध्यम मोहीम राबवली.
स्ट्राँग रुममधून ईव्हीएमची यंत्रे मतमोजणी केंद्रावर नेल्या जातील. तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यावर नजर ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. स्ट्राँग रुमच्या साठवणुकीच्या ठिकाणांवरून ईव्हीएम यंत्रे मतमोजणीच्या केंद्राकडे नेल्या जातील. तेव्हा त्यांनी (भाजपा) यंत्रे बदलण्याचा कट रचला आहे, असाही आरोप त्यांनी केला.
एक्झिट पोलचा कौल भाजपाच्या बाजूने
पश्चिम बंगालमध्ये ७ पैकी ५ चाचण्यांनी भाजप बहुमताचा जादूई आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर दोन चाचण्यांनी मात्र सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाच पूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत केले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्यांदा सत्ता राखणार की, परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देत जनता भाजपकडे सत्ता सोपवणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेस ममता बॅनर्जींची साथ देणार?
पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ९२.६७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. हे वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात जाणार, याबद्दलही उत्सुकता आहे. दरम्यान पाच एक्झिट पोलनी भाजपा सत्ता स्थापन करण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर आता काँग्रेसच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबतचा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर खरगे यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. ते म्हणाले, “आताच काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण थांबूया.” आजवर काँग्रेसही भाजपाप्रमाणेच तृणमूलच्या विरोधात आक्रमकपणे बंगालमध्ये लढत आली आहे. खरगे यांनी पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट नकारही दिलेला नाही. त्यावरून पश्चिम बंगालच्या राजकीय रणधुमाळीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
