Mamata Banerjee : कोलकाता येथील आर.जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार झाला आणि तिची अत्यंत क्रूर पणे हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर सुरु झालेली आंदोलनं अद्यापही थांबलेली नाहीत. डॉक्टरांनी सुरु केलेली ही आंदोलनं थांबावीत यासाठी ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी आर.जी. कर महाविद्यालयाला भेट दिली. सरकार तुमच्या पाठिशी आहे असं ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) त्यांना म्हणाल्या. या प्रकरणातला आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी यांनी आज आर. जी. महाविद्यालय आणि रुग्णालयात जे आंदोलन करत आहेत त्या सगळ्या डॉक्टरांची, ट्रेनी डॉक्टरांची भेट घेतली. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांना आम्ही कठोर शासन करु असं आश्वासन ममता बॅनर्जींनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिलं. तसंच त्या म्हणाल्या मी सीबीआयला सांगू इच्छिते की या प्रकरणाचा तपास तीन महिन्यांत पूर्ण करावा. शनिवारी दुपारी ममता बॅनर्जींनी ( Mamata Banerjee ) आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेतली.
मला माझ्या पदाची चिंता नाही
ममता बॅनर्जी यावेळी डॉक्टरांना उद्देशून म्हणाल्या, मला माझ्या पदाची चिंता मुळीच नाही. मला तुम्हा सगळ्या आंदोलनकर्त्या डॉक्टरांची काळजी आहे. तुम्हाला ज्या वेदना झाल्या आहेत त्या माझ्याही वेदना आहेत. तुम्हा सगळ्यांच्या सुरक्षेचीही मला चिंता आहे. तसंच तुम्हाला जे वाटतं आहे तेदेखील मी समजू शकते. मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छिते की या प्रकरणात जे कुणीही दोषी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आता तुमच्या कामावर परता. असं आवाहन ममता बॅनर्जींनी केलं.
सरकारवर विश्वास नसेल तर मी पद सोडायलाही तयार
काही दिवसांपूर्वीही ममता बॅनर्जी आंदोलनकर्त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी डॉक्टरांची एक बैठकही बोलवली होती. मात्र त्यांनी बोलवलेल्या बैठकीला कुणीही गेलं नाही. त्यानंतर ममता बॅनर्जी असंही म्हणाल्या होत्या की जर तुमचा सरकारवर विश्वास नसेल तर मी मुख्यमंत्रिपदही सोडायला तयार आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की डॉक्टरांशी चर्चा करण्याची तयारी मी दर्शवली होती. तीन दिवस मी ते भेटीला येतील म्हणून वाट पाहिली. मी त्यांची वाट पाहूनही ते आले नाहीत. जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी माझं पद सोडायलाही तयार आहे. आजही त्यांनी जेव्हा डॉक्टरांशी संवाद साधला तेव्हा मला माझं पद महत्त्वाचं नाही असं म्हटलं आहे.