पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला मोठा धक्का दिला. आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांचा पराभव होऊन देखील त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलंच तापलं आहे.
यातच पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी टीएमसी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आणि निवडणुकीतील निकालानंतर कायदा सुव्यवस्थेच्या अनुंषगाने पोलिसांनी काही व्हीआयपी ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली होती.
यामध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. मात्र, आता ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिरिक्त सुरक्षा आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरील तैनात केलेली अतिरिक्त सुरक्षा हटवण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा बॅरिकेड्स आणि अतिरिक्त सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरील सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत टीएमसीच्या पराभवानंतर अवघ्या दोन दिवसांत ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिरिक्त सुरक्षा कमी करण्यात आल्याने त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “बुधवारी सकाळी ६:३० पासून १८८ ए हरीश चॅटर्जी, १२१ कालीघाट रोड आणि ९ कॅमॅक स्ट्रीट या तीन ठिकाणांवरील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला आहे. तसेच बॅरिकेड्ससारख्या काही सुरक्षा व्यवस्थेच्या जागी आता हाताने वापरता येणारे रेलिंग लावण्यात आले. १८८ ए हरीश चॅटर्जी हे ममता बॅनर्जी यांचं निवासस्थान आहे, तर १२१ कालीघाट रोड हे पक्षाचं मुख्यालय आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांचं कार्यालय ९ कॅमॅक स्ट्रीट येथे आहे.”
झेड प्लस सुरक्षा कायम
दरम्यान, “झेड प्लस सुरक्षा व्यवस्था कायम राहील. झेड प्लस श्रेणीच्या सुरक्षेपलीकडे तैनात करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस कर्मचारी मागे घेण्यात आले आहेत”, अशी माहिती एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, अतिरिक्त सुरक्षा कमी करण्याचे आदेश कोलकाता पोलीस सहआयुक्त कार्यालयातून जारी करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
