Mamata Banerjee : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून पश्चिम बंगाल सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावरूनच आता ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. याप्रकरणी भाजपा आणि सीपीआयकडून खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा – …तर सीबीआय तपासासाठी तयार! डॉक्टर बलात्कार, हत्याप्रकरणी ममता बॅनर्जींची भूमिका; रुग्णालयांमध्ये निदर्शने सुरूच

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

“कोलकात्यात महिला डॉक्टरबरोबर घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. मात्र, भाजपा आणि सीपीआय या घटनेवरून खालचा पातळीवरचं राजकारण करत आहेत. त्यांना राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की मी सत्तेची लालची नाही. याप्रकरणी आमच्या सरकारने योग्य ती कारवाई केली आहे”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.

“आमच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी…”

“या घटनेची माहिती मिळताच मी पोलीस आयुक्तांना फोन केला होता. तसेच पीडित तरुणीच्या परिवारातील सदस्यांशीदेखील मी चर्चा केली. घटना घडली त्या दिवशी आम्ही रात्रभर याप्रकरणावर लक्ष ठेवून होतो. आमच्यावर टीका करण्यापू्र्वी आम्ही याप्रकरणी कोणती आवश्यक ती कारवाई केली नाही? यांचं उत्तर विरोधकांनी द्यावं”, असेही त्या म्हणाल्या.

कोलकाता पोलिसांचं केलं कौतुक

पुढे बोलताना त्यांनी कोलकाता पोलिसांचंदेखील कौतुक केलं. “घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तरुणींचा मृतदेह लगेच शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर योग्य ती कारवाई करत त्यांनी १२ तासांच्या आत एका आरोपीला अटक केली”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण: तपास सीबीआयकडे; कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश, ममता सरकारला धक्का

प्रकरण सीबीआयकडे हस्तांतर, ममता बॅनर्जी म्हणाल्या…

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतर करण्यात आलं आहे. याबाबतही ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं. “आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत असून सीबीआयला या प्रकरणी पूर्ण सहाकार्य करण्याची आमची भूमिका आहे. त्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत”, असे त्या म्हणाल्या.