Mamata Banerjee Slaps TMC Worker Video Viral: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बुधवारी कोलकातामध्ये झालेल्या एका आंदोलनात गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाने टीका केली.

नेमकं काय घडलं?

ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाबाहेर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या युवक आघाडीने काढलेल्या एका निदर्शनावेळी मोठा गोंधळ झाला. यामध्ये पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेनंतर ममता बॅनर्जी स्वतः रस्त्यावर उतरून जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करत होत्या. रुग्णवाहिका आणि इतर गाड्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्याच्या सूचना त्या कार्यकर्त्यांना देत होत्या.

याच गोंधळात एका कार्यकर्त्याने त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांच्याभोवती सुरक्षेसाठी मानवी साखळी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक ममता बॅनर्जी यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट त्या कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. तृणमूल काँग्रेसच्या (ममता बॅनर्जी यांचा गट) नेत्यांनी या घटनेवर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

भाजपा-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये राडा

बरूईपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक आघाडीने निदर्शन आयोजित केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाच्या परवानगीने निदर्शन रॅली ‘बालीगंज फाडी’ ते ‘हाजरा’ या मार्गावर काढण्यात आली. मात्र, तृणमूलने केलेल्या आरोपानुसार, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रॅलीत घुसखोरी केली आणि रॅली अडवण्याचा प्रयत्न केला.

रॅलीदरम्यान भाजपा आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी अनेक नेत्यांवर अंडी फेकण्यात आली तसेच ‘चोर-चोर’ अशा घोषणाही देण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला.

ममता बॅनर्जींचा पोलिसांवर आणि भाजपावर आरोप

या हिंसाचारात तृणमूलचे तब्बल ४१ नेते, समर्थक आणि कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ममता बॅनर्जी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजपाने पूर्वनियोजित हल्ला केला असून महिला आणि पुरुषांना मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी कोलकाता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते,” असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

तर दुसरीकडे, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.