बेथुआडहारी : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि काँग्रेसबरोबर भाजपने समझोता केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला. नादिया जिल्ह्यात आयोजित सभेत त्या बोलत होत्या. बॅनर्जी म्हणाल्या, “निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगाल कॅडरमधील अनेक अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून तमिळनाडूत पाठवण्यात आले. त्यामुळे भाजप, काँग्रेस, स्टॅलिन यांच्यात काहीतरी गुप्त समझोता झाला असावा.” भाजप पश्चिम बंगालमध्ये स्वतःचे अधिकारी महत्त्वाच्या पदांवर ठेवून त्यांची मोकळीक निश्चित करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

पश्चिम बंगालमधील अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना निवडणूक निरीक्षक म्हणून तामिळनाडूत पाठवण्यात आल्याने त्याचा राज्यातील विकासकामांवर परिणाम होत आहे. सुमारे ५०० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामानाने इतर राज्यांत खूपच कमी बदल करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकांनंतर भाजपविरोधात विरोधकांची एकजूट उभारण्यासाठी देशभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्र सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी इशारा दिला की, जर तुम्ही तसे केले नाही, तर जनता तुम्हाला तसे करण्यास भाग पाडेल. भाजप सत्तेत आल्यास बंगालमध्ये मासे, मांस आणि अंड्यांच्या खाण्यावर निर्बंध येतील. एसआयआर प्रक्रियेमुळे २५० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्याची जबाबदारी भाजपने घ्यावी, असे त्यांनी म्हटले. सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगही केंद्राचा पोपट आहे, त्यामुळे आपण निवडणूक आयोगाला दोष देत नसल्याचे त्या म्हणाल्या. मालदाच्या मोथाबारी येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या घेराव प्रकरणाला तृणमूल काँग्रेस पाठिंबा देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.