TMC MP Sushmita Dev resigns: विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीचा सामना करत आहेत. ६१ आमदारांनी ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केल्यानंतर आता बंडखोरीची ही लाट संसदेत देखील पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सुखेंदू शेखर रॉय यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता ममतांना दुसरा धक्का बसला आहे. तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव यांनी देखील राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असून, सूत्रांच्या माहितीनुसार त्या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
सुष्मिता देव या आसामच्या सिलचार येथून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. २०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर देव यांनी २०२१ मध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममतांनी देखील देव यांना पक्षात योग्य स्थान देत त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली. यानंतर सुष्मिता देव यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. दरम्यान, सध्या पक्षात सुरु असणाऱ्या बंडखोरीत त्यांनी देखील सामील होण्याचा निर्णय घेत, राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुखेंदू शेखर रॉय यांच्या राजीनाम्यानंतर देव यांच्या रुपाने ममतांना या आठवड्यातील दुसरा धक्का बसला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
सुष्मिता देव यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रात, आपला राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, देव यांनी राजीनामा दिल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमती बिस्वा सरमा यांची भेट घेतली असून, त्या लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सुखेंदू शेखर रॉय यांच्यानंतर दुसरा राजीनामा
सुखेंदू शेखर रॉय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. पक्षातील भ्रष्टाचार आणि चुकीच्या गोष्टींवर रॉय यांनी जोरदार प्रहार केला होता. ममतांचे सरकार राज्यात आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरण व्यवस्थित हताळले नसल्याचा आरोप केला होता. रॉय यांनी याबाबतचे एक खरमरीत पत्र देखील ममता बॅनर्जींना लिहून राज्यसभेचा राजीनामा दिला. रॉय यांनी या पत्रात शिक्षण, आरोग्य, औद्यागिक क्षेत्र, रोजगार आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांवर बोट ठेवले होते. पक्षातील भ्रष्टाचारावर देखील त्यांनी भाष्य केले होते.
