पश्चिम बंगालच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. तब्बल ५९ आमदार आणि २० खासदार फुटले. एवढंच नाही तर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या घडामोडीनंतर आता पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बड़ाइक यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बड़ाइक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बड़ाइक यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिले होते.
यावेळी शमिक भट्टाचार्य म्हणाले की, “गेल्या ५० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या राजकारणाचं वर्चस्व राहिलं. आधी डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता आणि त्यानंतर टीएमसीची सत्ता. त्यामुळे पश्चिम बंगालमधील विकास खुंटला होता. पण आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून टीएमसीमधील तीन खासदारांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. आज ते तिघेही सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बड़ाइक भाजपामध्ये सामील झाले आहेत.”
तृणमूल काँग्रेसच्या ४४० कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तीन बँक खात्यांमधील ४४० कोटी रुपयांच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली. तृणमूल काँग्रेसची ४४० कोटी रुपये जमा असलेली ३ बँक खाती ईडीने गोठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा आणखी एक धक्का असल्याचं बोललं जात आहे. कोलकात्यातील टीएमसीची ४४० कोटी रुपये जमा असलेली तीन बँक खाती ईडीने गोठवण्याचे आदेश देत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे.
वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत सुरू असलेल्या मनी लाँडरिंगच्या तपासाचाच एक भाग म्हणून ईडीने ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जाते. या बरोबरच विमानसेवा, प्रवास आणि संबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून १५० कोटींहून अधिक रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान चार्टर्ड विमानांसाठी वापरलेला निधी कुठून आला? त्याचा मूळ स्रोत काय होता? किंवा मूळ स्रोत लपवण्यासाठी निधी विविध संस्थांमार्फत फिरवण्यात आला का? याची देखील तपासणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
