पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं. या निवडणुकीत टीएमसी पक्षाचा दारूण पराभव झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता, त्यामुळे भाजपा आणि टीएमसीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.
या सर्व घडामोडीनंतर आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. कारण टीएमसीमधील खासदारांचा एक गट ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टीएमसी पक्षातही फूट पडण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर टीएमसी पक्षातील काही नेते तळ्यात-मळ्यात म्हणजे पक्षांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ज्यांना पक्ष सोडायचा असेल, त्यांनी खुशाल सोडा, मी पक्षाची पुनर्बांधणी करेन’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
Today, our Hon'ble Chairperson @MamataOfficial and our Hon'ble National General Secretary @abhishekaitc met with our contesting candidates, at Kalighat.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) May 15, 2026
They fought with unmatched courage despite facing unimaginable atrocities and relentless intimidation.
The Trinamool Congress… pic.twitter.com/u4Of6S1D4l
टीएमसीच्या पुनर्बांधणीचे कार्यकर्त्यांना आदेश
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आता माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या आगामी भूमिकेबाबत मार्गदर्शन केलं. तसेच जे नेते, जे पदाधिकारी पक्षांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत, त्याच्याबाबत ममता बॅनर्जी यांनी मोठं भाष्य केलं.
ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी टीएमसीच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पत्करून आता आपली संघटना पुन्हा उभी राहील. पक्षाची पुनर्बांधणी आपल्याला करायची आहे. पण जर कोणी तृणमूल काँग्रेस सोडण्यास इच्छुक असेल तर ते स्वतंत्र आहेत”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

“जे इतर पक्षांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना जाऊ द्या. मी स्वत: पक्षाची पुनर्बांधणी करेन. जे पक्षातच राहणार आहेत, त्यांना मी सांगते की, आपल्या पक्षाचे नुकसान झालेले जे कार्यालये आहेत, ते पुन्हा बांधा. त्यांना रंगवा आणि पुन्हा सुरू करा. गरज पडल्यास मी देखील येईल. तृणमूल काँग्रेस कधीही झुकणार नाही. जनतेचा कौल लुटला गेला आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, टीएमसीच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या बैठकीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढलेल्या सर्व उमेदवारांची प्रशंसा केली. पोस्टमध्ये म्हटलं की, “तृणमूल काँग्रेस एका कुटुंबाप्रमाणे आहे. जे लोकांचा कौल लुटतात त्यांच्यासमोर आम्ही कधीही झुकणार नाही. सत्याचाच विजय होईल.”
ममता बॅनर्जींचा पराभ, सुवेंदू अधिकारी विजयी
भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पाच वर्षांपूर्वी पराभव केला होता. त्याच अधिकारी यांनी आता २०२६ मध्ये पुन्हा तोच विक्रम करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा पराभव केला. नंदीग्राममध्ये पराभव झाल्यानंतर याच भवानीपूर मतदारसंघाच्या मदतीने ममता बॅनर्जी विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आता त्यांना भवानीपूरही गमवावं लागलं. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३,९१७ मते मिळाली आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५,१०५ मतांनी पराभव केला. ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली.

सुवेंदू अधिकारी कोण आहेत?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत झाली. मुख्यत्वे भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांची लढत लक्षवेधी ठरली. अवघ्या देशाचं लक्ष या जागेवर होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ममता बॅनर्जींचा दारुण पराभव झाला. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. नंदिग्राम मतदारसंघातूनही ते विजयी झाले.
सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा (TMC) बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखलं जातं.
