भाजपा सोडून टीएमसीमध्ये सामील झालेले नेते बाबुल सुप्रियो यांनी आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.  ममता बॅनर्जी यांना भेटून मला खूप आनंद झाला. ज्या प्रेमाने त्यांनी माझे TMC कुटुंबात स्वागत केले ते प्रेरणादायी आहे, अशी भावना बाबुल सुप्रियो यांनी व्यक्त केली. 

बाबुल सुप्रियो म्हणाले की, “आमच्या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी २०२४ मध्ये पंतप्रधान व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही.”

नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले बाबुल सुप्रियो टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बुधवारी ते दिल्लीला जाऊन लोकसभा अध्यक्षांना भेटतील आणि आसनसोलच्या खासदारपदाचा राजीनामा देतील. यापूर्वी देखील त्यांनी खासदारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विनंतीवरून त्यांनी राजीनामा दिला नव्हता. 

आता मोकळ्या मनाने काम करू शकेल

ममता बॅनर्जींना भेटल्यानंतर बाबुल सुप्रियो म्हणाले, “दीदींनी फोन केला होता. म्हणूनच मी भेटायला गेलो होतो. त्यांना माझ्यावर विश्वास ठेवला त्याचा मी आदर करतो. मी आता मोकळ्या मनाने काम करू शकेल आणि मनापासून गाणी गाऊ शकेल. दीदी सांगतिल ते गाणे मी म्हणेल.” पक्षात तूम्हाला कोणती जबाबदारी देण्यात येत आहे. यावर बोलतांना सुप्रियो म्हणाले, “हे दीदी सांगतिल, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. मी पक्ष आणि दीदींचा आभारी आहे. एवढे प्रेम आणि विश्वास मिळाल्याने खूप छान वाटत आहे. दीदींनी मला पूजेच्या वेळी गाणे गाण्यास सांगितले आहे.”

भाजपावर आरोप

भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपा नेते स्वपन दासगुप्ता यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक पहायला मिळाली होती. बाबुल सुप्रियोच्या पक्षांतरामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते, असा दावा स्वपन दासगुप्तानी केला होता. या दाव्याला उत्तर देताना सुप्रियो म्हणाले, की भाजपामध्ये सामील झाल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांना महत्वाची पदं देण्यात आली होती, त्या प्रतिस्पर्ध्यांबाबतही हेच खरं असावं. तसेच मी पक्ष बदलून इतिहास रचला आहे का? असं असेल तर भाजपमध्ये सुद्धा दुसऱ्या पक्षातून नव्यानं सामील झालेल्या ‘एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यां’च्या गळ्या भेटी घेतल्या गेल्या आहेत आणि त्यांना उच्च पदांवर बसवले गेले आहे. हे सर्व करताना जे भाजपाचे तळागाळातील खरेखुरे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. जर तुमचं म्हणणं आहे मी पक्ष बदलून माझी स्वत:ची प्रतिमा खराब करून घेतली आहे तर मग भाजपमध्ये आलेल्या लोकांची देखील प्रतिमा खराबच झाली असेल नाही का?’ असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.

राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बाबुल सुप्रियो यांना टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर भाजप समर्थकांचा राग येणं आणि सामान्य लोकांचा तिरस्कार वाटणं खूपच स्वाभाविक आहे. याला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले, “हे मला मान्य असून माझा राग खरा आहे. तसेच याच बाबुलने बाहेरच्यांना भाजपमध्ये घेण्याचा जाहीरपणे निषेध केला होता त्याचे काय? त्यावेळी काय भाजपने बाबुलची प्रतिमा चांगली केली होती का? याच समर्थकांना विचारा ज्यांना या बाहेरून आलेल्या लोकांनी बाजूला केले होते,” असंही बाबुल सुप्रिया म्हणाले.