ममतांची आज सोनिया, पवार भेट

नवी दिल्ली : पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतर ममता बॅनर्जी या संयुक्त पुरोगामी आघाडीतील दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीच्या चाचपणीसाठी ममता राजधानीत आल्याचे मानले जात आहे.

गेल्या आठवडय़ात ममता बॅनर्जी यांनी फोन करून दिल्लीला येत असल्याचे कळवले होते. त्यांची दिल्लीत बुधवारी भेट होण्याची शक्यता असल्याचे शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते कमलनाथ, आनंद शर्मा यांची मंगळवारी भेट घेतली. ममतांच्या काँग्रेस नेत्यांशी होत असलेल्या गाठीभेटीमुळे आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अधिक समन्वय साधला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तीन वर्षांंनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जात असून ममता बॅनर्जी देशपातळीवर व्यापक भूमिका निभावण्याचीही शक्यता आहे.

राजकीय धोरणांवर आम्ही चर्चा केली नाही, यासंदर्भात सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये चर्चा केली जाईल. इंधन दरवाढ आदी देशस्तरावरील विद्यमान समस्यांवर आम्ही बोललो, असे कमलनाथ यांनी ममतांच्या भेटीनंतर सांगितले. कमलनाथ व आनंद शर्मा यांचे ममतांशी सौहार्दपूर्ण संबंध असून कमलनाथ कोलकाताला गेल्यावर ममतांची आवर्जून भेट घेत असतात. काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी सर्वोच्च न्यायालयात तृणमूल काँग्रेसची बाजू मांडत असल्याने त्यांच्याही भेटीचे आयोजन करण्यात आल्याचे तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले. ममता बॅनर्जी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून ममतांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची बैठकही होणार आहे. पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेसप्रमाणे तृणमूल काँग्रेसनेही दोन्ही सदनांमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेत मंगळवारी दुपारच्या सत्रात तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांच्या ‘खेल होबे’च्या घोषणाबाजीत सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले.

बॅनर्जी यांची पंतप्रधानांशी चर्चा 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. करोनासंदर्भातील लस, औषधे आदी विविध मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे ममता यांनी बैठकीनंतर सांगितले. ‘पेगॅसस’प्रकरणी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी व सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी ममता यांनी केली.