West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपाने येथे अभूतपूर्व आघाडी घेतली असून तृणमूलची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार भाजपाने बहुमताचाही आकडा पार केला असून तृणमूल काँग्रेसने शंभरीही गाठलेली नाही. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचं आवाहन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात आज एक व्हिडिओ पोस्ट केला असून भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली

ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेत व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या आहेत, “मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडू नये. हा भाजपचा प्लॅन आहे, मी कालपासून सांगतेय की त्यांना आधी आघाडीवर दाखवलं जाईल. त्यांनी अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली आहे. “

आपण १०० हून अधिक जागांवर आघाडीवर

“कल्याणीमध्ये अशी यंत्रे सापडली आहेत जिथे मेळ बसत नाहीये; केंद्रीय दलांच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसवर (TMC) सर्व बाजूंनी अत्याचार केले जात आहेत. ‘एसआयआर’च्या (SIR) माध्यमातून त्यांनी मते चोरण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही आपण १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहोत, जे नोंदवलं जात नाहीये. सगळं काही चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे”, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

सूर्यास्तानंतर आपणच जिंकू

“निवडणूक आयोग पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने काम करत आहे आणि केंद्रीय दलेही त्यांच्यासोबत आहेत. पोलीस देखील केंद्रीय दलांसोबत काम करत आहेत. मी पक्ष कार्यकर्त्यांना सांगते की निराश होण्याची गरज नाही; सूर्यास्तानंतर आपलाच विजय होईल. मतमोजणीच्या केवळ २-४ फेऱ्या झाल्या आहेत, मतमोजणी १४-१८ फेऱ्यांपर्यंत चालते आणि आपणच जिंकू. कुणीही घाबरण्याची गरज नाही”, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.