तृणमूल काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ममता बॅनर्जी यांनी एका आंदोलनावेळी झालेल्या गोंधळादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेवरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेचं तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी समर्थन केलं आहे. ‘मग काय झालं?’, अशी प्रतिक्रिया खासदार सौगत रॉय यांनी दिली आहे. तसेच या घटनेवरून कोणताही वाद न करण्याचं आवाहन सौगत रॉय यांनी केलं आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

सौगत रॉय यांनी काय म्हटलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. या घटनेबाबत बोलताना खासदार सौगत रॉय यांनी म्हटलं की, “हो, मग काय झालं? ममता बॅनर्जी या पक्षातील कार्यकर्त्यांच्या अत्यंत जवळ आहेत. त्या त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना बाळगतात आणि त्यानुसार वागतात. या वादाचा अतिरेक करण्याची काहीही गरज नाही.”

काय घडलं होतं?

तृणमूल काँग्रेसच्या युवक आघाडीने काढलेल्या एका निदर्शनावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जखमी झाले होते. या घटनेनंतर ममता बॅनर्जी स्वतः रस्त्यावर उतरून जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करत होत्या. रुग्णवाहिका आणि इतर गाड्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्याच्या सूचना त्या कार्यकर्त्यांना देत होत्या.

पण याच गोंधळात एका कार्यकर्त्याने त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्याभोवती सुरक्षेसाठी मानवी साखळी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या (ममता बॅनर्जी यांचा गट) नेत्यांनी या घटनेवर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नव्हतं. मात्र, आता या घटनेवर खासदार सौगत रॉय यांनी प्रतिक्रिया देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.