Mamata Banerjee Prediction by Vikram Chandiramani : पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी विधानसभा मतदान प्रक्रिया पार पडली असून आज ४ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जीं केंद्रस्थानी राहिल्या. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमुल पक्षाला भाजपाचं कडवं आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रचाराला जोर आला होता. आरोप-प्रत्यारोपांना उत आला होता. या लढतीचा केंद्रबिंदू ममता बॅनर्जी असून त्या आजही बंगालच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली शक्ती आहेत. त्यांचे स्थान आजही अढळ का आहे, हे समजून घेण्यासाठी केवळ निवडणुकांच्या गणितांच्या पलीकडे जाऊन पहावे लागेल. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचं राजकीय भवितव्य काय असेल यावर प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ विक्रम चंदीरामानी यांनी अंदाज वर्तवला आहे.

संघर्षातून निर्माण झाले व्यक्तिमत्त्व

ममता बॅनर्जींचा प्रवास हा कधीच एका पारंपारिक राजकारण्यासारखा राहिला नाही. त्यांचे राजकारण संघर्ष, टिकून राहण्याची जिद्द, प्रसंगावधान, भावनिक आवाहन आणि जनसामान्यांच्या नाडीची अचूक पकड यावर उभे आहे. अनेक दशकांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या या प्रतिमेमुळे त्या आजही आदरास पात्र आहेत.

५ जानेवारी १९५५ रोजी कोलकात्यात जन्मलेल्या ममता बॅनर्जी यांनी अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून वर येत भारतीय राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. १९८४ मध्ये त्यांनी जादवपूरमध्ये सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव करून संसदेत प्रवेश केला, हा त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा होता. हा विजय त्यांच्या ‘शनी परतीच्या’ काळाशी जुळून आला, जो ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील महत्त्वाचे वळण आणि जबाबदारी वाढवणारा काळ मानला जातो. त्यांच्या बाबतीत या विजयाने केवळ संधीच उघडल्या नाहीत, तर दबाव आणि संघर्षातून सतत पुढे जाण्याच्या त्यांच्या जीवनाचा एक आराखडाच तयार केला.

त्यांची कुंडली त्यांच्या राजकारणाचे वेगळेपण स्पष्ट करते. धनु राशीतील सूर्य आणि बुध त्यांना वैचारिक शक्ती, स्पष्टवक्तेपणा आणि तडजोड न करण्याची वृत्ती देतात. त्या थेट आणि स्पष्ट बोलतात, यामुळे कधी कधी संघर्ष निर्माण होतो. पण त्यातूनच त्यांची विश्वासार्हता निर्माण होते. वृषभ राशीतील चंद्र त्यांना भावनिक स्थिरता आणि सहनशक्ती देतो. एकदा त्यांनी एखादी भूमिका घेतली की त्या मागे हटत नाहीत. हीच स्थिरता त्यांना मोठ्या राजकीय संकटातही टिकवून ठेवते. कुंभ राशीतील मंगळ त्यांच्या राजकीय संघर्षाची अनोखी आणि कधीकधी धक्कादायक पद्धत दर्शवतो. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचा निषेध करणाऱ्या एका खासदाराला चक्क गचांडी धरून लोकसभेबाहेर काढले होते. ही प्रतिमा त्यांच्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवणारी होती.

गुरु कर्क राशीत असल्याने त्यांचे जनतेशी एक विलक्षण भावनिक नाते आहे. यामुळेच त्या लोककल्याणाच्या राजकारणाला केवळ धोरणांपुरते मर्यादित न ठेवता त्याला वैयक्तिक आणि भावनिक स्वरूप देतात. वृश्चिक राशीतील शुक्र आणि युरेनस-प्लुटोचे योग त्यांना एक प्रकारचे ‘पॉप्युलिस्ट’ तेज देतात, त्यामुळे त्या सामाजिक भिंती ओलांडून लोकांशी जोडल्या जातात. यामुळेच त्यांच्याबद्दल निष्ठा आणि विरोध अशा दोन्ही टोकाच्या भावना निर्माण होतात.

१९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, जो काळ त्यांच्या ‘साडेसाती’च्या सुरुवातीचा होता. हा काळ मोठ्या जोखमीचा आणि दबावाखाली स्वतःला सिद्ध करण्याचा होता. इथूनच त्या एका पक्षातील बंडखोर नेत्याऐवजी एका नव्या राजकीय शक्तीचे केंद्र बनल्या. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनांनी बंगालचे राजकारण कायमचे बदलले. त्यांनी स्वतःला जमीन, उपजीविका आणि सन्मानाचे रक्षक म्हणून उभे केले. या आंदोलनांमुळे जरी कॉर्पोरेट जगताशी त्यांचे अंतर वाढले असले, तरी शेतकरी आणि ग्रामीण मतदारांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले.

पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

२०११ मध्ये, जेव्हा पुन्हा एकदा शनीचा प्रभाव वाढला, तेव्हा ममता बॅनर्जींनी ३४ वर्षांची डाव्या आघाडीची सत्ता संपवून मुख्यमंत्रीपद भूषवले. सत्तेत आल्यावर टाटा नॅनो प्रकल्पातील जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरला. त्यांच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या गेल्या, पण त्याच वेळी भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लेही केले. शुभेंदु अधिकारी यांच्यासारख्या नेत्यांमुळे भाजपाने त्यांना मोठे आव्हान दिले आहे. डावे आणि काँग्रेस वेगळे लढत असल्याने विरोधकांची मते विभागली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या १५ वर्षांपासून तृणमुल कांग्रेसची पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता आहे. सत्तेविरोधी लाट आणि असंतोष असला तरी, ममता बॅनर्जींचे राजकारण आजही जनतेच्या भावनिक विश्वाशी जोडलेले आहे. त्यांच्या जन्मकुंडलीतील ग्रहमान आणि राजकीय पकड पाहता, त्या पुन्हा एकदा सत्तेवर येतील असे दिसते. ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज आहेत.