scorecardresearch

खोटारड्या मोदींचे तोंड सर्जिकल टेपने बंद करा-ममता बॅनर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ममता बॅनर्जींची तिखट शब्दात टीका

ममता बॅनर्जी

खोटं बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंड सर्जिकल टेपने बंद केले पाहिजे अशी घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे एवढंच नाही तर ते कायम खोटं बोलत असतात त्यामुळे त्यांच्या तोंडाला सर्जिकल टेप लावून ते बंद केले पाहिजे असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागराकाटा येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातले गरीब,मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पाचपैकी साडेचार वर्षं तर मोदींनी जगभ्रमंतीत घालवली असाही टोला ममता बॅनर्जींनी लगावला. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. खोटं बोलण्याची स्पर्धा घेतली तर त्यात मोदींचा पहिला नंबर येईल असाही खोचक टोला ममता बॅनर्जींनी लगावला. मोदींचे तोंड चिकटपट्टी लावून बंद केले पाहिजे म्हणजे मग ते खोटं बोलू शकणार नाहीत. त्यांना खुर्चीपासूनच नाही तर राजकारणातूनच दूर सारले पाहिजे अशीही टीका ममता बॅनर्जींनी केली. नोटाबंदी झाल्यानंतर ज्या रांगा लागल्या त्यात अनेकांचे मृत्यू झाले, देशात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, नोटाबंदीमुळे अनेकजण बेरोजगार झाले तेव्हा मोदी कुठे होते असाही प्रश्न ममता बॅनर्जींनी विचारला.

रविवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाच्या मातीसोबत विश्वासघात केला असे मोदी म्हटले होते. माँ माटी मानुष ही ममता बॅनर्जींची घोषणा फोल ठरली असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. त्याच टीकेला आज ममता बॅनर्जी यांनी कठोर शब्दात तिखट प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mamata banerjees controversial statement against pm narendra modi

ताज्या बातम्या