भवानीपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“नंदीग्राममध्ये रचलेल्या षडयंत्राला भवानीपुरने जोरदार प्रत्युत्तर दिले.”, असंही बोलल्या आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागल्या होते. अखेर या ममता बॅनर्जी यांनी यामध्ये बाजी मारली. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ”मी भवानीपुरच्या जनतेची ऋणी आहे.” असं म्हणत ममता बॅनर्जींनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “नंदीग्राममध्ये रचलेल्या षडयंत्राला भवानीपुरने जोरदार प्रत्युत्तर दिले. भवानीपुरमध्ये जवळपास ४६ टक्के लोक बंगाली नाहीत. त्यांनी देखील मला मतदान केलं. पश्चिम बंगालची जनता भवनीपुरकडे पाहत आहेत, ज्यांनी मला प्रेरित केलं आहे. जेव्हापासून पश्चिम बंगालची निवडणूक सुरू झाली, केंद्र सरकारने आम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं होतं. माझ्या पायाल दुखापत झाली जेणेकरून मी निवडणूक लढू नये. मी जनतेची आभारी आहे की त्यांनी मला मतदान केलं आणि निवडणूक आयोगाने देखील सहा महिन्यांच्या आतमध्ये निवडणूक घेतली.”

भवानीपूरमध्ये ‘खेला होबे’ ; पोटनिवडणुकीत विजयी होत ममता बॅनर्जींनी कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mamata banerjees first reaction after winning the bhawanipur by election said msr

Next Story
गांधी जयंतीनिमित्त दिलेल्या जाहिरातीत केजरीवालांचा फोटो महात्मा गांधींपेक्षा मोठा? जाणून घ्या सत्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी