प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचे ममतांचे प्रयत्न

लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. त्याचबरोबर घराणेशाहीला विरोध असून, दंगलखोरांना आम्ही सत्तेत येऊ देणार नाही, असे सांगत काँग्रेस आणि भाजपला विरोध राहील हे स्पष्ट केले.
आम्हाला लोकांचे सरकार हवे आहे असे त्यांनी येथील जाहीर सभेत स्पष्ट केले. भाजप, काँग्रेस तसेच साम्यवाद्यांबरोबरही आघाडी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यांचे हित जपण्यासाठी प्रादेशिक पक्षांची आघाडी व्हावी अशी आपली भूमिका आहे. सरकार स्थापनेत संधी या आघाडीला मिळाली तर आपण पाठिंबा देऊ, असे बॅनर्जी यांनी सांगितले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पश्चिम बंगालला सापत्न वागणूक दिल्याचा आरोपही ममतांनी केला. देशाबाहेरील काळा पैसा परत आणण्याची मागणीही त्यांनी केली. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी जाहीर केले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे काँग्रेसच्या हातातील बाहुले असल्याची टीका ममतांनी केली. २००७ मध्ये नंदीग्राम येथील गोळीबारप्रकरणी सीबीआयने डाव्या आघाडीची चूक नसल्याचे स्पष्ट केले होते. १४ मार्च २००७ मध्ये गोळीबारात १४ जण ठार झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mamata calls for a federal front says tmc will fight lok sabha polls alone