रेखा, जया बच्चन यांच्यापाठोपाठ आता ‘गन मास्टर जी-९’ म्हणजेच मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेत प्रवेश होण्याचा मार्ग निश्चित झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
या वेळी पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाच उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यापैकी एका जागेसाठी मिथुन चक्रवर्ती यांना तृणमूल काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात येणार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवरून स्पष्ट केले आहे.
मिथुन चक्रवर्ती हे चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आपले आयुष्य सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याला वाहिले आहे आणि त्यामध्ये यशही मिळविले आहे. मिथुन चक्रवर्ती ही केवळ पश्चिम बंगालचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
येत्या एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पाच उमेदवारांची मुदत संपुष्टात येत असून त्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मिथुन चक्रवर्ती आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध सौहार्दाचे आहेत. पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.