कोलकाता : शिक्षक भरती घोटाळासंबंधी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आलेले पार्थ चॅटर्जी यांना पश्चिम बंगाल सरकारने मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. पार्थ चॅटर्जी यांच्याकडे उद्योग, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य यांसह विविध खात्यांची जबाबदारी होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, पार्थ चटर्जी पाहात असलेल्या सर्व खात्यांचा कारभार सध्या तरी मी पाहणार आहे. शालेय सेवा आयोगाच्या शिक्षक भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने ईडीकडून चॅटर्जी यांची चौकशी करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीपदाचा कार्यभारही खांद्यावर असणाऱ्या चॅटर्जी यांना २३ जुलै रोजी ईडीकडून अटक करण्यात आली. पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांनाही ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. कोलकात्यातील मुखर्जी यांच्या मालकीच्या विविध घरांमध्ये कोटय़वधी रुपयांच्या नोटा आढळल्या.

भाजपचा मोर्चा

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी पश्चिम बंगाल भाजपकडून गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. तृणमूल काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते या मोर्चात सहभागी झाले होते. मध्य कोलकात्यातील राणी राशमोनी मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला होता. ‘‘ शालेय सेवा आयोगाचा भ्रष्टाचार हे केवळ हिमनगाचे टोक आहे. तृणमूल काँग्रेस आणि राज्य सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडालेले आहे,’’ अशी टीका मुजुमदार यांनी केली.