पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकणाऱ्या प्रियंका शर्मा या तरुणीला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रियंका शर्माने त्या छायाचित्रासाठी माफी मागितली पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याबद्दल पोलिसांनी भाजपाच्या एका महिला कार्यकर्त्याला अटक केली होती. प्रियंका शर्माने अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्याऐवजी ममता बॅनर्जी यांचा चेहरा असलेले छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. पोलिसांच्या या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती.  न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्टाने प्रियंका शर्मा यांना विनाशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले. प्रियंका शर्मा यांनी माफी मागितल्यावर त्यांची तुरुंगातून सुटका करावी, असे निर्देशही कोर्टाने दिले. तसेच पश्चिम बंगाल सरकारलाही सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली असून राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एखाद्या राजकीय नेत्यावर कारवाई करता येईल का, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने बचाव पक्षाच्या वकिलांना पुन्हा बोलावले. माफी मागण्याची अट शिथील करत कोर्टाने तरुणीची तत्काळ तुरुंगातून सुटका करावी, असे निर्देश दिल्याचे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.