scorecardresearch

केरळ: अननसात स्फोटकं ठेऊन गर्भवती हत्तीणीला मारणारा दीड वर्षानंतर झाला सरेंडर

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना २७ मे रोजी घडली होती.

Kerala-Pregnant-elephant-dies-after-being-fed-pineapple-stuffed-with-crackers
(संग्रहित छायाचित्र एएनआयवरून साभार)

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना २७ मे रोजी घडली होती. केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात घडलेली ही घटना समोर आल्यानंतर, सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला गेला. ही घटना घडल्यानंतर प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर एका आरोपीने शनिवारी पलक्कड जिल्ह्यातील मन्नारक्कड येथील मुन्सिफ दंडाधिकारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. हा आरोपी जवळपास दीड वर्षांपासून फरार होता.

आरोपीच्या आत्मसमर्पणानंतर, केरळ वन विभागाने त्याची कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आत्मसमर्पण करणारा रियाझुधीन हा या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. तर रियाझुधीनचे वडील आणि प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मन्नारकडचे डीएफओ एम के सुरजीत यांनी रियाझुधीनकडून या प्रकरणाची अधिक माहिती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रियाझुधीनला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात बेकायदेशीरपणे स्फोटके बाळगल्याचा आणि त्यांचा गैरवापर केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण..

एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. ते खाल्ल्यानंतर, अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबुक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली होती. “हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा धमाका इतका मोठा होता की हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावात सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. फळाचा स्फोट झाल्यानंतर, काही वेळाने ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली, असे क्रिश्नन यांनी सांगितले. दरम्यान, या हत्तीणीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणलं, पण तरीही ही हत्तीण बाहेर आली नाही आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 14:38 IST